महाराष्ट्र करतोय कोरोनाशी दोन हात

आठवडा विशेष टीम―

गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाशी लढा सुरू आहे. हा लढा सुरू असताना त्यात मिळणारे यश, त्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजना यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी शांतीलाल मुथ्था यांनी संवाद साधला. हा संवाद चर्चासत्र मालिकेच्या स्वरुपात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आजपासून कोरोनाशी दोन हातया नावाने प्रसारित होत आहे. बुधवार दि. २ सप्टेंबर ते सोमवार दि. ७ सप्टेंबर पर्यंत दररोज रात्री ९ वाजता सह्याद्री वाहिनीवर ही चर्चा पहावयास मिळणार आहे. आज प्रसारित झालेल्या पहिल्या भागातील चर्चेचा हा संपादीत अंश.

श्री. शांतिलाल मुथ्था : महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यस्थिती काय आहे? किती बाधित आहेत, किती अॅक्टिव रुग्ण आहेत, किती लोकं बरे झालेत, किती टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : सध्या महाराष्ट्रामध्ये साडेसहा लाख लोक कोरोनाबाधित झालेले आहेत. त्यातील अंदाजे पाच लाख लोक बरे होऊन त्यांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. सध्या दीड लाख लोक उपचार घेत आहेत. त्यातील ८० टक्के हे लक्षणे नसलेले (asymptomatic) आहेत. १५ टक्के मध्यम स्वरूपाचा प्रादुर्भाव असलेले आणि ५ टक्के गंभीर स्वरूपाचे रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूचा दर हा ३.३ च्या दरम्यान आहे. हा दर सुरुवातीला ९ टक्के, ७ टक्के होता तो आता ३ टक्क्यांवर आला आहे. मृत्यूदर १ टक्क्यापेक्षा कमी करण्याचं उद्दिष्ट आहे.

श्री. शांतिलाल मुथ्था : सध्या हर्ड इम्युनिटी, सिरो सर्वेक्षण याविषयी बोललं जातं. परंतु असे बरेच लोक आहेत की ज्या लोकांनी चाचणी न करता ते कोरोनातून बरे झालेत आणि त्यांना त्याची काहीच माहिती नाही. त्यांच्या या टक्केवारीत समावेश केला तर तो ३ टक्क्याचा दर ०.०१ टक्क्याच्या आसपास येऊ शकतो याबद्दल आपण काय सांगाल.

आरोग्यमंत्री राजेश टोपे : मुंबई शहरात सिरो सर्वेक्षण केलं असता जिथे दाटीवाटीची वस्ती आहे तिथला अहवाल सांगतो की, ५६ टक्के लोकांमध्ये ॲण्टीबॉडीज तयार झाल्या आहेत. विरळ वस्ती, अपार्टमेंट, बंगल्याचा ठिकाणी हे प्रमाण १८ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या लक्षात येईल की, संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. आपण म्हणता तसं संसर्ग झाला सुद्धा आणि लोकं बरे झाले सुद्धा. मृत्यूचा दराची एकूण संसर्गाशी तुलना केली तर तो एक टक्क्याच्या कमी किंवा ०.१ येईल. म्हणजे हजारात एक केस अशी येईल. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही. या विषाणूचा संसर्ग मोठ्या पद्धतीने होतो. परंतु मृत्यूदर कमी आहे. त्यासाठी आपल्याला शिक्षित व्हावं लागेल.

श्री. शांतिलाल मुथ्था : असिम्प्टोमॅटीक म्हणजे ज्यांना लक्षण नाहीत ते लोकं इतरांना हा संसर्ग देऊ शकतात का ? एखाद्या व्यक्तीला सिम्प्टम्स नाहीत हे कसं कळणार ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : ज्यांना लक्षणे नाहीत याचा अर्थ असा की थोडाफार विषाणू संसर्ग त्यांच्या शरीरामध्ये असेल परंतु त्या रुग्णाच्या शरीरातील न्यूट्रेलायजिंग ॲण्टीबॉडीज् नी त्याच्यावर मात करून त्या विषाणूला मारलेही असेल. तो डेथ व्हायरसही असू शकतो. परंतु कोरोना चाचणीच्या (RTPCR) माध्यमातून त्याचे अचूक पद्धतीने निदान करू शकतो. तर अशा वेळेस त्याच्यापासून संसर्ग होणारच नाही. परंतु असिम्प्टोमॅटीकमुळे सौम्य स्वरुपाने संसर्ग होण्याचा संभव असतो मात्र त्याचे प्रमाण जास्त नसते.

श्री. शांतिलाल मुथ्था : एका घरामध्ये १५ व्यक्ती आहेत, दोन व्यक्तींना संसर्ग झाला १३ व्यक्तींना झाला नाही. प्रत्येक घरामध्ये वेगळं चित्र आहे. लोकं संभ्रमामध्ये आहेत, नेमका याचा प्रवास कसा आहे, याचं बिहेविअर कसं आहे यासंदर्भात महाराष्ट्रातल्या जनतेला आपण मार्गदर्शन करावं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे : साधारणपणे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना कोरोनाची बाधा लवकर होऊ शकते किंवा त्याचं स्वरूप सौम्य चे मध्यम, मध्यम चे गंभीर होऊ शकतं. त्यासाठी आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे एका कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला संसर्ग होतो व इतरांना होत नाही, म्हणजे इतरांची प्रतिकारशक्ती सशक्त आहे. हा विषाणू आपल्या तोंडाद्वारे, नाकातून बाहेर पडलेल्या शिंतोड्यातून पसरतो. जर आपण एका ठराविक अंतरावर बसलेलो आहोत आणि आपल्या पुढे बाधित व्यक्ती बसली असेल तरी त्याचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही. समजा आपली प्रतिकारशक्ती भक्कम असली आणि त्याचा प्रादुर्भाव जरी झाला तरी तो कमी जाणवेल, ती व्यक्ती पटकन बरी होऊ शकते.

श्री. शांतिलाल मुथ्था : पती-पत्नी या दोघांपैकी जर एखाद्याला झाला व एखाद्याला नाही झाला तर त्याची प्रतिकारशक्ती भक्कम आहे. त्याच्या घशामध्ये ते व्हायरस तिथेच मरतात, म्हणून त्याला होत नाही. प्रत्यक्षात त्या व्यक्तीने त्या विषाणूला तोंड दिलेलं असतं. मग आपण असं म्हणू शकतो का की त्याच्यामध्ये अॅंटीबॉडीज तयार झालेल्या असतील किंवा त्याला पुन्हा कधी कोरोना होऊ शकणार नाही.

आरोग्यमंत्री राजेश टोपे : आपल्या ज्या न्यूट्रेलायजिंग ॲण्टीबॉडीज असतात कदाचित या माध्यमातून त्या व्हायरसशी लढण्यासाठी यशस्वी होतात. त्यामुळे आपल्याला त्याचा प्रादुर्भाव होत नाही किंवा झाला तरी तो कमी प्रमाणात होतो आणि त्याच्यावर लवकर मात केली जाते. संसर्गजन्य आजारामध्ये प्रतिकारशक्ती (immunity) हा फार महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं गरजेचं आहे.

श्री. शांतिलाल मुथ्था : अॅंटीजीन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट, अॅंटीबॉडी टेस्ट अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टबद्दल सर्वसामान्य लोकांना योग्य माहिती नाही. अॅंटीबॉडीची टेस्ट करून मला कोरोना नाही अशाप्रकारचे काही गैरसमज लोकांमध्ये आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे : साधारणतः अँटीजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट या निदान करण्यासाठीच्या टेस्ट आहेत. तिसरी अँटीबॉडी टेस्ट आहे, यातून आपल्याला संसर्ग केव्हा झाला, होऊन गेला का की आता लगतच्या काळात झाला या गोष्टी कळतात. आपण पॉझिटिव्ह आहोत की निगेटिव्ह आहोत हे अँटीबॉडी टेस्ट मधून समजत नाही. आरटीपीसीआर टेस्ट हिला आपण गोल्‍ड स्टँडर्ड टेस्ट म्हणतो. ज्याची स्पेसीफायसिटी आणि सेंसीव्हीटी म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर त्या वेळेला तो १०० टक्के पॉझिटिव्ह असतोच. परंतु त्याची स्पेसीफायसिटी ६६ टक्के आहे. त्यामध्ये रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर ३३ टक्के त्या पॉझिटिव्ह असू शकतील. त्याचा रिपोर्ट यायला ८ ते १२ तास लागू शकतात. थोडी महागडी सुद्धा आहे.

दुसरी अँटीजेन टेस्ट ज्याचा रिपोर्ट अर्धा तासात मिळतो. एखाद्या समूहामध्ये १-२ केसेस पॉझिटिव्ह झाल्या तर त्या समूहाची अँटीजेन टेस्ट करून आपल्याला त्याचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून उपयोग होऊ शकतो. हि टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ती १०० टक्के पॉझिटिव्ह आहेच. परंतु जर तुम्ही सिम्प्टोमॅटीक असाल व लक्षणं असतील तर पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे. तिसरी टेस्ट आहे अँटीबॉडीज् जी सर्वेक्षणाच्या दृष्टीकोनातून आवश्यक आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी जे मोठ्या संख्येने कर्तव्यावर असतात, आघाडीवर राहून काम करतात ह्या सर्वांना मोठ्या पद्धतीने संसर्ग होतो, त्यासाठी अँटीबॉडीज् टेस्ट करता येते. याला रॅपीड अँटीबॉडी टेस्ट म्हणतो. जर अँटीबॉडीज् टेस्ट केली आणि त्यामध्ये आयजीजीच प्रमाण आढळलं तर संसर्ग होऊन गेलेला आहे व त्यापासून इतर कोणाला संसर्ग होणार नाही. या व्यक्तींचा प्लाझ्मा डोनेट केला तर त्यापासून इतरांचे जीव वाचवता येऊ शकतात.

श्री. शांतिलाल मुथ्था : कोरोनाच्या संदर्भातील कुठलीही चाचणी करायची असेल तर जी काही व्यवस्था यासंदर्भात महाराष्ट्र शासनाची आहे, त्या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकाल?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : आत्तापर्यंत ३५ लाख चाचण्या आपण महाराष्ट्रामध्ये केलेल्या आहेत. आता अॅंटीजेन टेस्ट हे जास्त लोकांना सोपं वाटतं. एकतर ती घरी राहून सुद्धा करता येते, तालुकास्तरावर करता येते, यामुळे सोप्या पद्धतीने लवकर निदान करता येतं. तसेच संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये सुद्धा हे करता येऊ शकेल किंवा एखाद्या संस्थेमध्ये जर अधिक संशयित लोक असल्यास त्यांचीही टेस्ट याद्वारे करता येते. यासाठी अगदी किरकोळ स्वरूपात आपण नाकातून स्वॅब (nasal swab) घेत असतो. त्यासाठी ३०-४० सेकंद लागतात. अर्ध्या तासाच्या आत त्याचा रिपोर्ट येतो. जर पॉझिटिव्ह असेल तर पटकन त्याला अलगीकरण कक्षामध्ये टाकता येतं किंवा लक्षण असतील तर त्यांना डिसीएचसीमध्ये ठेवता येतं.

००००

  • मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज रात्री ९.०० वाजता ही चर्चासत्र मालिका प्रसारित होणार आहे.
  • गुरूवार दि. ३ सप्टेंबर रोजी कोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी याविषयी चर्चा केली जाईल.
  • शक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी कोरोना: अवास्तव भीती व गैरसमज
  • शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी कोरोनासह जगण्याची तयारी
  • रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी कोरोना: प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व
  • सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी कोरोना: प्लाझ्मा व सिरो सर्व्हेलन्स या विषयांवर चर्चा होणार आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.