डॉ.आंबेडकर नगर, कफ परेड येथील अनधिकृत झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी समिती – वनमंत्री संजय राठोड

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि २ :- मुंबईतील कफ परेड येथील डॉ.आंबेडकर नगरातील अनधिकृत झोपडपट्टीधारक यांच्यासाठी ठोस पुनर्वसन प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधान सचिव (गृहनिर्माण) यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

डॉ. आंबेडकर नगर येथील अनधिकृत झोपड्या कांदळवन कक्ष व वन विभागामार्फत निष्कासित करण्यात आल्या होत्या. सदर कारवाई विरोधात घर बचाओ घर बनावो आंदोलन या सामाजिक संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने मानवी हक्क आयोगाने या अतिक्रमण झोपडपट्टीधारक यांच्यासाठी ठोस पुनर्वसन प्रकल्प तयार करण्यासाठी विशेष समिती नेमण्याची सूचना केली होती. या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तर अपर मुख्य सचिव वने,उपसंचालक म्हाडा, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (कांदळवन कक्ष) व जिल्हाधिकारी मुंबई उपनगर हे सदस्य म्हणून काम करणार आहेत.

सदर समिती झोपडपट्टीधारक यांच्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची कागदपत्रे तपासणे, पात्रता ठरवणे व पुनर्वसनासाठी शिफारसी करणे याबाबत कार्यवाही करणार आहे, अशी माहितीही मंत्री श्री. राठोड यांनी दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.