सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या विकासासाठी सीडबी यांच्या समवेत सामंजस्य करार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २ : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचा विकास व्हावा यासाठी उद्योग विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशात सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाच्या वाढीसाठी, सुलभ वित्त पुरवठा व विकासासाठी काम करणारी सीडबी या संस्थेसोबत राज्य शासनाने आज सामंजस्य करार केला आहे

प्रस्तुत सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाच्या वतीने उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळेव सीडबीच्या वतीने उपव्यवस्थापकीय संचालक व्ही.एस.व्ही राव यांनी स्वाक्षरी केली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी हे उपस्थित होते.

या समंजस्य करारांतर्गत सीडबीमार्फत उद्योग विभागात एक प्रकल्प व्यवस्थापन घटक (PMU) स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्प व्यवस्थापन घटकाची भूमिका ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाची विकासासाठी विविध योजना / कार्यक्रमांची आखणी करणे असे असणार आहे. यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना भाग भांडवल सहाय्य, व्याज अनुदान, आजारी पडण्याच्या मागावर असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना सहाय्य, तसेच विद्यमान सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचे मूल्यमापन करुन आवश्यकतेनुसार सहाय्य करणे याचा समावेश राहिल.

तसेच राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विद्यमान योजना / कार्यक्रमांचा अभ्यास करुन सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांची गुणवत्ता वाढावी व त्यांच्या अडी अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने विद्यमान योजना / कार्यक्रम इत्यादी मध्ये आवश्यकता असल्यास त्याप्रमाणे प्रकल्प व्यवस्थापन घटकाकडून सुधारणा सुचविण्यात येणार आहेत.

राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विकासाकरिता पूरक वातावरण निर्मिती करुन या उद्योगांना बळकटीकरण प्राप्त करुन देण्याचा सीडबी यांचा मानस आहे. महाराष्ट्र शासनास सहकार्य करुन राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या सर्वकष विकासाकरिता प्रभावी अवलंब करुन विद्यमान धोरणांचा आणि योजनांचा कायाकल्प करणे आणि अधिक प्रमाणात प्रतिसाद देणारी पुरवठा साखळी सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट सीडबी यांचे असेल.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.