दोन दिवसात पूरग्रस्तांचे पंचनामे सादर करा

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. 2 : नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागामध्ये जाऊन तातडीने पंचनाम्याला सुरुवात करण्याचे निर्देश, राज्याचे पशुसंवर्धनमंत्री ना. सुनील केदार यांनी आज दिले.

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे व मध्य प्रदेशातील चौराई धरण तुडुंब भरल्याने तसेच पेंच व तोतलाडोह धरणात पाण्याच्या साठा वाढल्यामुळे कन्हान नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठावरील जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झालेले आहे. नदीला आलेल्या महापुरामुळे १९९४ ची पुनरावृत्ती झालेली आहे. या महापुरामुळे नागपूर जिल्ह्यातील सावनेर, मौदा, पारशिवणी ,कामठी तालुक्यातील अनेक गावाना तडाखा बसलेला आहे. पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल झाले आहे. कित्येक ठिकाणी जीवितहानीसुद्धा झालेली आहे. अनेकांची घरे, जनावरे, घरातील साहित्य, शेती, शेतीसाहित्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आलेल्या नैसर्गिक संकटाच्या धर्तीवर सामान्य नागरिकांना योग्य व तातडीची मदत मिळावी व त्यांचे योग्य पुनर्वसन झाले पाहीचे या करिता महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. सुनील केदार यांनी सावनेर व कळमेश्वर तहसील कार्यालय येथे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.या बैठकीमध्ये मंत्री सुनील केदार यांनी येत्या दोन दिवसात पूरग्रस्त भागाचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

मंत्री सुनील केदार यांनी या अहवालात किती जीवितहानी झाली, शेतीचे नुकसान किती झाले, जनावरांची हानी, शेतीसाहित्यांची हानी, विद्युत विभागाचे पोल, शेती बंधारे नुकसान इत्यादी प्रमुख बाबींचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्यास सांगितले. या वेळी सावनेर व कळमेश्वर तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.