आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि.३: केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या २०२१ साठीच्या ‘बाल शक्ती पुरस्कार’ आणि ‘बालकल्याण पुरस्कारा’साठी येत्या दि. १५ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
‘बाल शक्ती पुरस्कार’ हा वय ५ वर्षे ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी असून शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो.
‘बालकल्याण पुरस्कार’ हा वैयक्तिक पुरस्कार आणि संस्था पुरस्कार अशा दोन गटात दिला जातो. वैयक्तिक पुरस्कार हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. संस्था स्तरावरील पुरस्कार हा बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला दिला जातो. संस्था पूर्णतः शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
बाल शक्ती पुरस्कार सन २०२१ आणि बालकल्याण पुरस्कार २०२१ साठीचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. पुरस्कारांविषयी अधिक माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे, असेही आयुक्तालयाने कळविले आहे.