भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून विकासकामे वेगाने पूर्ण करावी – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

बुलडाणा दि.3 : जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामध्ये सिंचन, रस्ते यासह अन्य कामांचाही समावेश आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र अनेक कामे भूसंपादन, वन विभागाची परवानगी आदींमध्ये अडकली आहेत. तरी अशा कामांमध्ये यंत्रणांनी समन्वय ठेवून ही समाजहितोपयोगी कामे वेगाने पूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विकास कामांबाबत भूसंपादन प्रकरणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी षण्मुखराजन, अपर जिल्हाधीकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर जी पुरी आदी ‍ उपस्थित होते.

खामगांव –चिखली राष्ट्रीय महामार्गावरील पैनगंगा नदीवरील पुलाचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या पूलासाठी भूसंपादनाची कार्यवाही तात्काळ करावी. संबधित यंत्रणांनी प्राधान्याने या कामाला गती देवून सदर पूल पूर्ण करावा. भूसंपादन प्रकरणांमध्ये वारंवार बैठका घेऊन प्रक्रीया पूर्ण करून घ्यावी.

समृद्धी महामार्गाचा आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, समृद्धी महामार्गाचे काम संबधित कंपनीने दर्जेदार करावे. त्यासाठी यंत्रणांनी लक्ष द्यावे. समृद्धी महामार्गमध्ये भूसंपादन शेष असलेल्या जमिनीबाबत शेतकऱ्यांची समजूत काढावी. त्यांना प्रकल्पाचे लाभ लक्षात आणून द्यावे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित गावात जावून शेतकऱ्यांशी संवाद करावा. या महामार्गाच्या कामामुळे खराब झालेले ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग संबंधित कंपनीने दुरूस्त करून द्यावे. महामार्गालगत उभारण्यात नवनगरांच्या आजुबाजूला जमीन घेण्यासाठी मोठ्या शहरांमधून लोक येत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी नवनगरां जवळील शेतीचे लाभ लक्षात आणून द्यावे. त्यांना विक्रीपासून परावृत्त करावे.

गौण खनिज आढावा घेताना पालकमंत्री यांनी सूचीत केले, रॉयल्टी घेण्याची पद्धत सुटसुटीत करावी. त्यामुळे अनेक वेळा कंत्राटदारांकडून विकास कामे वेळेत पूर्ण केल्या जात नाही. ही पद्धत सोपी करून विकास कामे गतीने पूर्ण करण्यासाठी नियमानुसार कारवाई करावी. कंत्राटदरांनी गौण खनिजाची खोदाई ठरलेल्या ‍ठिकाणांहूनच करावी. खाजगी मालकीच्या क्षेत्रातून खोदकाम करू नये. सिनगांव जहागीर येथील भूखंड वाटप करताना पात्र- अपात्र लाभार्थी यांचा सर्वे करावा. त्यासाठी विहीत कालमर्यादा आखावी. बैठकीला संबधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

भोन येथील समृद्ध वारसा जतन करावा

संग्रामपूर तालुक्यात भोन येथे सम्राट अशोक कालीन अवशेष उत्खनामध्ये सापडले आहे. हा एक समृद्ध वारसा आहे. या वारस्याचे जतन झाले पाहीजे. कारण भोन जिगाव प्रकल्पामध्ये जाणार आहे. त्यामुळे योग्य स्तरावर भोन येथील उत्खनन होवून जमिनीत दडलेला हा समृद्ध सांस्कृतिक वारसा बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी संबधित यंत्रणांनी योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ.शिंगणे यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात भोन येथील उत्खननाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी आदी उपस्थित होते.

भोनबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करणार असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, भोन येथील जमिनीच्या उदरात दडलेले अवशेष बाहेर काढून त्याचे संवर्धन, जतन करण्यासाठी मंत्रालयात मा. मुख्यमंत्री किंवा मा.उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला बोलाविण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. यापूर्वी करण्यात आलेल्या पुरातत्व विभाग, पुणे येथील कॉलेजने केलेल्या उत्खननाचा आढावाही पालकमंत्री यांनी घेतला. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.सुपेकर यांनी जिगांव प्रकल्प व भोन बाबत केलेल्या कार्यवाहीची माहीती दीली. बैठकीला संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पीक विम्याच्या लाभापासून एकही पात्र नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात काही भागात अतिवृष्टी झाली. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच शेतांमध्ये नदीच्या पुराचे पाणी, धरणांमधून सोडलेले पाणी गेल्यामुळे पीके वाहून गेली. अशा परिस्थितीत पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मदतीचा लाभ देण्यात यावा. यामधून एकही नुकसानग्रस्त पात्र शेतकरी सुटता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पीक विमाबाबतबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी आदी उपस्थित होते. बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी माहिती दिली.

नुकसानीमध्ये मूग पीकाचे 100 टक्के नुकसान झाले असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, पिक विमा काढलेल्या मूंग उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सर्वे पूर्ण करावा. कृषी विभागाने याबाबत लक्ष घालून सर्वे पूर्ण करून घ्यावा. पात्र एकही शेतकरी मदतीपासून वंचित ठेवू नये. सर्वेमध्ये त्रुटी ठेवू नये. पोकरा योजनेत निवडलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात. तसेच या गावांमध्ये भेटी देवून तेथील शेतकऱ्यांचे समुपदेशन करावे. या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मिळवून द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

******

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.