लोकांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज

आठवडा विशेष टीम―

कोल्हापूर, दि. 3: पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच कोरोनामुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होऊ देऊ नका. इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करत आहेत. आपल्याकडे गणेशोत्सव, मोहरम पार पडला. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पाऊस सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रीत करा तर 15 दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रूग्णामागचे जास्तीत-जास्त संपर्क शोधा. चेस द व्‍हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा. कंटेन्मेंट क्षेत्रात कडक नियम पाळा. चाचण्यांची क्षमता वाढवा. घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या.

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहाय्यक यांच्या सहभागाने घरोघरी भेटी देऊन कुटुंबाच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, यात घरातील कुणाला इतरही काही आजार आहेत का. त्यांचे आरोग्य कसे आहे. त्यांना न्युमोनिया सदृश काही लक्षणे आहेत का. घरात बाहेरून कुणी व्यक्ती आले आहेत. मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का. याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल. केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका.

कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल, पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावा. शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री अतिशय महत्त्वाची आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सुविधा उभारण्यात मदत केली जाईल. निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा. अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी कोरोनाबाबतचा सविस्तर आढावा दिला. मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विगागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार श्री. मेहता यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ. सुहास वारके उपस्थित होते.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.