प्रशासकीयब्रेकिंग न्युज

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातल्या अडचणी तात्काळ दूर करून कालबद्धरितीने कामे पूर्ण करा – ठाकरे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 4: वरळी, एन एम जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा यादृष्टीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे झालेल्या एका बैठकीत निर्देश दिले

वरळी येथे बीडीडी चाळीत 9600 भाडेकरू असून त्यांची आवश्यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करून विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण झाले पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले. याकामी महसूल विभागाकडून आवश्यक तेवढे उपजिल्हाधिकारी किंवा नायब तहसीलदार नियुक्त करण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले.

ना. म. जोशी मार्ग येथे 32 चाळी असून 2500 भाडेकरू आहेत तर नायगाव येथे 42 चाळी आणि 3300 भाडेकरू आहेत. तेथील पुनर्विकास प्रक्रियेतील समस्या तातडीने दूर करून विकासास सुरुवात करावी तसेच भाडेकरूंचे योग्य स्थलांतर करावे असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

यासंदर्भात गृहनिर्माण प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास यांनी प्रारंभी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत वस्तुस्थिती सांगितली तसेच या प्रकल्पांची माहिती दिली. गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे हा पुनर्विकास रखडला असून त्याबाबतही येणाऱ्या अडचणींचा उहापोह त्यांनी केला. सर्वसामान्यांना घरे मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी या सर्व अडचणी दूर करून कालबद्ध रीतीने पुनर्विकास मार्गी लावावा व याबाबत दर काही दिवसांनी आढावा घेत राहावा अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

बैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे , टाटा हाऊसिंग, एल एन्ड टी कंपनी यांचे अधिकारी देखील उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.