आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क, सज्ज ठेवा

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

वाशिम, दि. ०४: देशात आणि राज्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. रुग्णवाढीचा दर लक्षात घेवून अतिरिक्त सुविधा निर्मिती आणि मनुष्यबळ उपलब्धतेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच ग्रामीण व शहरीभागात आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून कोरोना बाधितांचा शोध घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिल्या. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर वाशिम येथून उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात सद्यस्थितीत खाटांची संख्या, ऑक्सिजन सिलेंडर व व्हेंटीलेटरची सुविधा पुरेशी असली तरी भविष्यात रुग्ण संख्येत अचानक वाढ झाल्यास या सुविधेतही वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ थांबविण्यासाठी आवश्यक डॉक्टर, नर्स व इतर मनुष्यबळ तसेच औषधे, सामग्रीचा पुरेसा साठा सज्ज ठेवावा. तसेच भविष्यात आवश्यकता भासल्यास जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची सेवा ‘कॉल ऑन’ स्वरुपात उपलब्ध करून घेण्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी.

जिल्हा परिषदेला कोविड काळात नर्स, स्वच्छक आदी पदे भरण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यामाध्यमातूनही आवश्यकता असल्यास मनुष्यबळाची उपलब्धता ठेवावी. जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका सुस्थितीत आणि कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. राज्य शासनाने जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब उभारण्यास मंजुरी दिली असून ही लॅब लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी लॅबच्या कामाला गती द्यावी. जास्तीत जास्त सप्टेंबर अखेरपर्यंत लॅब कार्यान्वित होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

कोविड, नॉन-कोविड रुग्णांची काळजी घ्या

कोरोना बाधित व्यक्तींची कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये गैरसोय होणार नाही, त्यांना वेळेवर, योग्य उपचार मिळतील, याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या इतर रुग्णांनाही आरोग्य सुविधा मिळतील, याकडे लक्ष द्या. सर्व कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधीची कोणतेही कमतरता नसून जिल्हा नियोजन समितीचा निधी प्राधान्याने कोरोनासाठी वापरण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर करा

कोरोना बाधितांची संख्या वाढत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे व घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. सध्या दुकाने, आस्थापना सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली असल्याने नागरिकांनी दुकाने, बाजारपेठेत अनावश्यक गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर करून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची सद्यस्थिती, उपलब्ध खाटांची संख्या, सुविधा याविषयी माहिती दिली. तसेच कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना विषयी माहिती दिली.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, तसेच कोरोना काळात पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.