ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

आठवडा विशेष टीम―

◆ उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

◆ कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्या

◆ मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करा

पुणे,दि. 5: कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्यांची क्षमता वाढवून बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्यायला हवेत, अशा सूचना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केल्या

कोविड 19 विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन सभागृहात आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी खासदार श्री. पवार बोलत होते.

बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, केंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ. सुजितकुमार सिंह व सहसंचालक संकेत कुलकर्णी, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून चे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन खासदार शरद पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृती भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. बरेच नागरिक मास्कशिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्कशिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, अशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या.

खासदार शरद पवार म्हणाले, मॉल, बसस्थानक, रेल्वे स्थानक, मोठी दुकाने याठिकाण च्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी बंधनकारक करावी. बांधून तयार असणाऱ्या इमारतींचा उपयोग कोविड उपचार केंद्रासाठी करता येऊ शकेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, देशात सर्वात जास्त रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग पुण्यात आहे, ही चिंतेची बाब आहे. पुण्यातील रुग्णदर व रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र व्यवस्थापन, शासकीय, खाजगी व जम्बो हॉस्पिटलचे प्रभावी व्यवस्थापन याबरोबरच जनजागृतीवर भर द्यावा. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचे संदेशपर व्हिडिओ सोशल माध्यमातून प्रसारित करावेत, जेणेकरून लोकांमधील भीती कमी होईल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित असून नागरिकांनी समाजात वावरताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांकडून पोलीस विभागाने दंड वसूल करावा,असेही त्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्यात 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. विविध पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यात लोकप्रतिनिधी, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचा सहभागदेखील महत्त्वाचा आहे, असे सांगून श्री. टोपे म्हणाले, लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी बेड अडविला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णाच्या तब्येतीची माहिती नातेवाईकांना समजावी, यादृष्टीने रुग्णालयांनी खबरदारी घ्यावी, असे सांगून राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा श्री टोपे यांनी व्यक्त केली.

डॉ. सुजित सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील आजवरचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, तपासण्यांची संख्या, प्लाझ्मा थेरपी तसेच कोरोना व्यवस्थापनाच्या दृष्टीने पुढील नियोजनाबाबत माहिती दिली.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लवकर निदान होऊन रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने तपासण्या वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.