मालमत्ताविषयीच्या तक्रारींबाबत एसआयटी स्थापन करणार

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. 5 : भूखंड व मालमत्ता बळकविण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नागपुरात प्राप्त होत असून या संदर्भात नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिले.पोलिस जिमखाना येथे पोलिस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. उपाध्याय यांच्या सक्षम पोलीस प्रशासनामुळे नागपूरवरील ‘क्राईम कॅपिटलचा टॅग’ काढण्यात गृह विभाग यशस्वी झाला असल्याचे त्यानी सांगितले.

निरोपाला उत्तर देतांना डॉ. उपाध्याय यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. सांघिक कामगिरीच्या बळावरच नागपूरात पाचव्यांदा चांगले काम करु शकलो, अशी पावती त्यांनी दिली. नागपूरकर प्रेमळ व शांत असून दोन वर्षाच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर वचक बसविण्यात यशस्वी ठरल्याचे, त्यांनी सांगितले.

कोरोना लढाईत पोलिस दलाने उत्तम काम केले आहे. 165 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कोरोना प्रतिबंध करण्यात उत्तम कामगिरी बजावली असल्याचेही गृहमंत्री देशमुख म्हणाले.

यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही विचार व्यक्त केले. पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासोबतच नागपूरला गुन्हेमुक्त शहर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने तर आभार वाहतूक शाखेचे विक्रम साळी यांनी मानले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.