आठवडा विशेष टीम―
-
लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, मंडळे यांना सहभागी करा
-
गाफील न राहता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखा
मुंबई दि. 5: “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या राज्यस्तरीय अभियानाच्या माध्यमातून कोरोनावर मात करणे शक्य आहे. अनलॉकनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही निश्चित काळजीची गोष्ट असली तरी, मुंबई पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर यावर खात्रीपूर्वक मात करण्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगची संख्या वाढवून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुंबईतील महापालिका उपायुक्त, वॉर्ड अधिकारी, डॉक्टर्स, अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व पालिका अधिकाऱ्यांच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,प्रधान सचिव, सार्व. आरोग्य विभाग प्रदीप व्यास, मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी, पी. वेलारसू यांचीही उपस्थिती होती.
पुढील महिने खबरदारीचे
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढती संख्या वेळेतच नियंत्रित करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही, आगामी दोन महिने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. धारावी, वरळी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. ही वेळ कौतुक ऐकत बसण्याची नाही. गणपती उत्सवानंतर सणांची मालिका सुरु झाली आहे. हा काळ नववर्षापर्यंत आहे हे लक्षात घेवून कोरोना साथ नियंत्रणाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी गणपती, मोहरम अत्यंत संयमाने साजरे केले इथून पुढेही हाच संयम नागरिकांनी बाळगावा.
मोहिमेत सर्वाना सहभागी करा
चेस दि व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित आहोत. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करुन घ्या.
जम्बो सुविधा उत्कृष्ट
कोरोना ट्रॅकिंग ट्रेसिंग अधिक वेगाने वाढवावे लागेल. जंबो रुग्णालये तात्पुरती आहेत या गैरसमजातूनही लोकांनी बाहेर यावे. डायलिसीस आयसीयूच्या सुविधा देण्याबाबतीतही मुंबई मागे राहिली नाही. आरोग्य हीच आताच्या घडीला प्राथमिकता आहे. परप्रांतीय मजूर परतत आहेत त्यांच्यावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दिवसाला 1000 किंवा 1100 रुग्ण सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत असे वाटत होते पण गेल्या दोन दिवसांपासून 1900 आणि 1700 रुग्ण सापडत आहेत त्यामुळे पुढील दोन तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे हे निश्चित आहे.
ऑक्सिजनची वाढती गरज
सध्या आपण मुंबईत आणखी 5 ते 6 हजार बेडस उपलब्ध करून देऊ शकतो पण पुढील काळात सुविधाही आणखी वाढवावी लागणार तसेच ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडच्या नियोजनाची गरज आहे. ही वाढ अशीच राहिली तर बेड, ऑक्सीजनची कमतरता जाणवेल तशी वेळ येवू न देणे आपल्या सर्वांच्या हाती आहे. मुंबईतच नव्हे तर राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीतजास्त प्रमाणात वैद्यकीय कारणासाठी उपयोगात आणणे असे आदेश काढावे लागतील ट्रेकिंग आणि ट्रेसिंग वाढवून एकेका रुग्णाचे 20 नव्हे तर 30 संपर्क शोधणे आणि 48 तासांच्या आता त्या हाय रिस्क संपर्काची चाचणी करणे खूप आवश्यक आहे.
“माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या अभियानाद्वारे प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छेवर भर देवून वाढती संख्या रोखत कोरोनावर नियंत्रण मिळवायला हवे. मास्क हा या पिढीसाठी आवश्यक बाब बनली आहे. लोकांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे त्यादृष्टीने जागृती करणे आवश्यक आहे. श्रावणात मलेरिया, डेंग्यूची साथ वाढण्याचा धोका लक्षात घेवून पालिका प्रशासनाने तत्पर असावे, अशा सूचना केल्या.
कोविड पश्चात उपचारांसाठी ओपीडी
कोविडपश्यात रुग्णांचे वर्गीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, रुग्णांचा कोविडनंतरचा डेटा तयार केल्यास यावर नेमकी उपाययोजना राबविणे सोपे जाईल, कोरोनाकाळातील औषधोपचाराचे नेमके परिणाम मानवी शरीरावर कसे झाले आहेत हे स्पष्ट होवून पुढील उपचारपद्धतीत सुधारणा करता येईल. रुग्णालये, प्रशसानाने त्यादृष्टीने पावले उचलावित, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
सुविधा नव्हे रुग्ण सेवा द्या
औषध नसले तरी उत्कृष्ट रुग्ण सेवा आवश्यक आहे. यामुळे मृत्यू दर कमी होऊ शकतो नुसते बेडस, औषधे दिले म्हणजे आपण सुटलो असे नाही, रुग्ण सेवा चांगली पाहिजे. शिथिलता दूर करा, चूक शोधा आणि पाऊले टाका आपण कुठे कमी पडतो, आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल याचा विचार झाल्यास कोरोनावर नियंत्रण मोठी बाब नसल्याचे सांगत आजपर्यंत कोरोना नियंत्रणासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांना धन्यवाद दिले. कोरोना काळात जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी प्रारंभी कोरोनासंदर्भातील विविध उपाययोजना, अडचणींचा आढावा घेतला. नागरिकांनी खास कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या जंबो हॉस्पिटलमध्ये जावे, त्याबाबत नागरिकांत अनेक गैरसमज आहेत ते दूर करण्याची जबाबदारी पालिका वॉर्ड अधिकाऱ्यांची आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत वॉर्ड अधिकाऱ्यांनी रोज चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घ्यावा अशा सूचना केल्या. सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या रुग्णांवर अँटीजेन टेस्ट करावी. अँटीजेन टेस्टचा वापर टार्गेट ग्रुपवर केल्यास अधिक चांगले परिणाम येतील. सरकारी आणि खासगी इस्पितळांत लक्षणे नसलेल्यांना बेड देण्यात येवू नयेत. 50 वर्षांवरील नागरिकांना बेड न देता त्यांचे घरातच विलगीकरण करण्याबात सूचना देण्यात आल्या. खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना चहल यांनी दिल्या. 10 हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील करण्यात याव्यात. पोस्ट कोविड ओपिडी सुरु करणार असल्याचेही चहल म्हणाले. अशा ओपिडी सुरु झाल्यास कोविड पश्चात रुग्णांची नेमकी माहिती मिळून त्यांच्यावर उपचार करता येतील. कोविडसाठी बनविण्यात आलेल्या जंबो रुग्णांलयांचा रुग्णांनी लाभ घ्यावा. उत्तम दर्जाच्या सुविधा तिथेही उपलब्ध असल्याचे माहिती पालिका प्रशासनाने नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. जंबो रुग्णालयांच्या आसपासच्या मोठ्या खासगी रुग्णालयांच्या तज्ज्ञांनी जंबो रुग्णालयांना मार्गदर्शन करावे, टेलिमेडिसीनसारखे उपक्रम राबवून कोरोना संक्रमणास रोखण्यासाठी शासन, पालिका प्रशासनास सहकार्य करावे. ज्या वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर अधिक आहे तेथे विशेष उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
अजोय मेहता, प्रदीप व्यास यांच्यासह, विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, अधिकारी यांनीही यावेळी कोरोनासंदर्भातील उपाययोजना, सूचना मांडल्या.
11 वॉर्डमध्ये कोरोनाचा कमी प्रादुर्भाव; या बैठकीत खालील बाबींचाही उहापोह करण्यात आला.
- मुंबईतले 11 वॉर्ड बी,सी, ए, आरएन, एमडब्ल्यू, एचडब्ल्यू, एचई, एमई, पीएस, एफएन, ई यामध्ये कोविड पॉझिटिव्हचे प्रमाण खूप कमी म्हणजे 7 ते 8 टक्के इतके आढळले तर उर्वरित 13 वार्डात अधिक पॉझिटिव्हीटी आढळत आहे.
- मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यू दर कमी होत आहे. जून मध्ये तो 5.58%,जुलै 4.88%, ऑगस्ट 4.07%, सप्टेंबर 2.6%
- मुंबईत अतिशय उत्कृष्ट जम्बो सुविधा असून रुग्णांनी खासगी रुग्णालयांचा आग्रह न धरता याठिकाणी दाखल व्हावे,त्यांना निश्चितपणे चांगले उपचार मिळतील.
- प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याने त्यांच्या वॉर रुमद्वारे नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करावी व जम्बो मध्ये दाखल करण्यावर भर द्यावा.
- 50 वयापेक्षा जास्त आणि लक्षणे नसणाऱ्या व इतर कुठलेही मोठं आजार नसणाऱ्या व्यक्तींना घरीच विलगीकरणात ठेवावे.
- मुंबईत घरी विलगीकरण असलेल्या रुग्ण व त्यांच्या परिवारात लागण मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते.
- पूर्वी कोविड मुळे मुंबई पालिका व सार्वजनिक रुग्णालयांत असलेला मृत्यू दर 82 टक्के होता तो आता 59 टक्के इतका कमी झाला तर खासगी रुग्णालयांत पूर्वी कमी असलेला 18 टक्के मृत्यू दर वाढून 39 टक्के झाल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली.
- प्रत्येक जम्बो सुविधा नामांकित व मोठ्या रुग्णालयांच्या डॉक्टर्सना विभागून देखरेखीसाठी देण्याचा विचार.