आठवडा विशेष टीम― अमरावती, दि. ५ : हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करावी, असे निवेदन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे भारतभूमीचे थोर सुपुत्र होते. ते कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक, हरितक्रांती, धवलक्रांतीचे प्रणेते, रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्रातील अनेक नाविन्यपूर्ण योजनांचे संकल्पक, विकासाचे महानायक होते. त्यांना भारतरत्न मिळण्यासाठी आपण केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
बेलोरा विमानतळ विकासासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक व्हावी
अमरावती येथील बेलोरा विमानतळाच्या विकासाची कामे मंद गतीने होत असून, त्यांना गती मिळण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक व्हावी, असे निवेदन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
अमरावतीच्या बेलोरा विमानतळाच्या विकासाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणातर्फे होत आहे. त्याच्या कामकाजाची माहिती व आढावा नुकताच पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला होता. अमरावती शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी व येथील व्यापार- व्यवसाय, उद्योगवाढीच्या दृष्टीने विमानतळाची कामे सहा महिन्यांत पूर्ण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्राधिकरणाच्या अधिका-यांसमवेत शासन स्तरावर मंत्रालयात व्हावी, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
प्राधिकरणाने डिसेंबरपर्यंत धावपट्टीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. तथापि, प्रशासकीय इमारत व इतर कामेही वेळेत पूर्ण होऊन विमानसेवेला प्रारंभ होणे आवश्यक आहे. त्यामुळे फेज-1 व 2 मधील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून पाठपुरावा होत आहे.
आतापर्यंत झालेल्या कामांमध्ये बडनेरा यवतमाळ राज्य वळण महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. विमानतळावर 1 लाख लीटर क्षमतेचे भूमिगत पाणीसाठा (जीएसआर) व्यवस्था झाली आहे. संरक्षण भिंतीचे 15 कि.मी. लांबीचे बांधकाम हाती घेण्यात आले असून, एटीआर 72-500 कोड सी-3 विमानाच्या तात्काळ उड्डाणासाठी आवश्यक साडेसात किमी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दुस-या टप्प्यातील 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्टीचे विस्तारीकरण, टॅक्सीवे, अप्रॉन, आयसोलेशन बे, पेरिफेरल रोड, जीएसई एरिया, स्वच्छता यंत्रणा आदी कामे 70 टक्के पूर्ण झाली आहेत. ती डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील.
मात्र, प्रशासकीय इमारतीचे अंदाजपत्रक, निविदा तयार करण्याचे काम अद्यापही झालेले नाही. त्यामुळे मंत्रालय स्तरावर या विषयाचा पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याची विनंती पालकमंत्र्यांनी केली आहे.
शहर व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अमरावती येथून विमानसेवेला लवकरात लवकर आरंभ होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा व राज्य महामार्गाला जोडणारा 03. 10 किमी लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 49 चे मजबुतीकरण, सुधारणा, त्याचप्रमाणे, डीव्हीओआर सेक्शनजवळील निंभोरा- जळू ॲप्रोच रोडचे बांधकाम या अडीच किलोमीटर लांबीच्या कामालाही गती मिळणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक, वाणिज्यिक विकासाच्या दृष्टीने विमानतळ लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयांबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा बैठकीद्वारे होणार आहे.