अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई शहर व तालुक्यातील भूमिहीन मजूर व बांधकाम मजूर यांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी लॉकडाऊनच्या काळातील श्रमभत्ता म्हणून प्रति कुटूंब प्रति महिना 7,500/-रूपये अनुदानीत करावा असे एकुण 45,000/- हजार रूपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करावेत अशा मागणीचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उपजिल्हाधिकारी यांना देवून कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांचे नेतृत्वाखाली शनिवार,दिनांक 5 सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोना महामारीचे निमित्त व त्या आडून भाजपचे सरकार हे देशाच्या मालकीचे सार्वजनिक उद्योग भांडवलदारांच्या घशात घालीत आहे.देशातील कोट्यावधी मजुरांचे स्थलांतर होताना यांनी लोकांच्या मृत्यूचा तमाशा पाहिला.जबरदस्तीने 6 महिने देशाला व देशातील मजुरांना कोंडुन टाकले.त्यांची कसली ही व्यवस्था केली नाही.रेशनवर विकतचे धान्य व अपुरे वाटप करण्यात येते.याप्रश्नी 9 ऑगस्ट पासुन देशभर या मागणीसाठी श्रमिक वर्ग रस्त्यावर येत आहे.आपण या विभागातील श्रमिकांना श्रमभत्ता मिळण्याची शिफारस करावी म्हणून आम्ही आज 5 सप्टेंबर रोजी निदर्शने करीत आहोत असे निवेदनात नमूद केले आहे.सदरील निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, कॉ.भागवत जाधव, शारदा जाधव, अस्मिता ओव्हाळ, अनिल ओव्हाळ, आशाबाई जोगदंड, धीरज वाघमारे,राहुल पुनमसिंग टाक यांच्या स्वाक्ष-या आहेत.