प्लाझ्मादानामध्ये महाराष्ट्र आघाडी घेईल

आठवडा विशेष टीम―

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या चर्चासत्र मालिकेचा समारोप आज प्रसारित होणाऱ्या भागाने होत आहे. शेवटच्या भागात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी कोरोना: प्लाझ्मा आणि सिरो सर्व्हेलन्स याविषयी संवाद साधला. त्याचा संपादित अंश.

श्री. शांतिलाल मुथ्था : कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी करायचा असेल तर अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. प्लाझ्मा दिल्याने कोरोनाबाधित रुग्ण जे मध्यम स्वरूपाचे असतात त्यांना त्याचा फायदा होतो आणि ते त्यातून बरे होतात. कोरोनातून जे लोक बरे झाले आहेत त्यांच्याकडून प्लाझ्मा घेऊन आत्ता सध्या कोरोनाबाधित असणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय? प्लाझ्मा दिल्याने काय होतं? आणि प्लाझ्मा देण्यासाठी पात्रता काय?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : प्लाझ्माचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यामध्ये यशही मिळत आहे. साधारणपणे दहापैकी नऊ केसेसमध्ये प्लाझ्मा दिला गेला ते रुग्ण बऱ्यापैकी लवकर बरे झाले असा त्यातला अनुभव आहे. आपल्या शरीरातील रक्तातून पेशी बाजूला काढल्या तर जे पिवळे द्रव्य उरते तो प्लाझ्मा. त्याच्यामध्ये ज्या अँटीबॉडीज असतात त्या आपल्या शरीराच्या खऱ्या अर्थाने डिफेन्स मॅकॅनिजम असतात. ज्या व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त असतात.

प्लाझ्मा कोण देऊ शकतो? जी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील असेल, हिमोग्लोबिन (HB) १२.५ टक्के असेल, वजन साधारणपणे ५० किलोपेक्षा जास्त असेल, कोमॉर्बीडीटी नसेल, म्हणजेच रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मुत्रपिंड, हृदयविकार नसतील अशा लोकांचा प्लाझ्मा आपल्याला घेता येतो. जे लोक कोरोनाबाधित बरे होऊन २८ दिवस झाले आहेत त्यांना प्लाझ्मा दान करता येतो. प्लाझ्मा देत असताना प्लाझ्माफेरीसीस यंत्रातून काढला जातो. यामध्ये जो दाता आहे त्याचा प्लाझ्मा कम्पलसरी ट्रायटेट केला जातो आणि त्या ठिकाणी १:६४ अशा पद्धतीने ते असेल तर तो प्लाझ्मा पात्र असतो. आमच्या संकेतस्थळावर एसबीटीसी (स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल)” येथे भेट देऊन ज्याला प्लाझ्मा दान करायचाय आणि ज्याला प्लाझ्मा हवाय अशांची नोंद करता येते.

रक्तदान हे महान दान आहे तसे “प्लाझ्मादान हे श्रेष्ठदान” म्हणता येईल. प्लाझ्मा दान केल्याने काही त्रास होत नाही. आपण काही गरजूंचे जीव नक्की वाचवू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये जे कोरोनातून बरे झालेले पाच लाख लोक आहेत त्यापैकी प्लाझ्मा दानाच्या दृष्टिकोनातून बरेच जण पात्र असू शकतात. या सगळ्या योद्ध्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन प्लाझ्मा दानाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा अशी माझी विनंती आहे.

श्री. शांतिलाल मुथ्था: प्लाझ्मा द्यायचा म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून घेतला जातो. म्हणजे त्या व्यक्तीचे रक्त घेतले नाही असा जर मी त्यातून अर्थ काढला तर तो बरोबर आहे का?

आरोग्यमंत्री राजेश टोपे: बरोबर आहे. त्यातल्या पेशी ज्या आहेत त्या आपल्या जवळ राहतात व पिवळ्या रंगाचा द्रव कोरोनाबाधित रुग्णाला दिला जातो.

श्री. शांतिलाल मुथ्था: अठरा वर्षाच्या पुढील कोमॉर्बीड नसलेले, प्रकृती चांगली असणे ही एक पात्रता झाली. दुसरी पात्रता अशी क, त्यांन आधी रक्त चाचणी करून एचआयव्ही, हेपॅटायटस बी आहे का? या सगळ्या गोष्टी बघणं, त्याच्यानंतरच मग प्लाझ्मा घेणे जरुरी आहे का?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : एखाद्याचे वजन ४० किलो असेल तर त्याचा प्लाझ्मा घेणे शक्य होणार नाही. एखाद्याचं हिमोग्लोबीन ८ टक्के असेल आणि ती व्यक्ती कोरोनातून बरे झाला असेल तरीही प्लाझ्मा दानासाठी ते पात्र नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती घेणे व पात्रता तपासणे महत्वाचे आहे.

श्री. शांतिलाल मुथ्था : प्लाझ्मादानासाठी पात्रता तपासणीनंतर प्लाझ्मा दात्याबरोबर सुसंवाद असणे गरजेचे आहे. कारण आधी ते सांगतात की प्लाझ्मा द्यायला तयार आहेत. परंतु नंतर नाही म्हणतात.

आरोग्यमंत्री राजेश टोपे : प्लाझ्मा देण्यासाठी योग्य प्रकारे समुपदेशन करता आले पाहिजे. प्लाझ्मा दान हे एक खूप श्रेष्ठदान आहे, हा विश्वास त्याला वाटणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी त्याचे प्रबोधन करणे, प्रोत्साहित करणे, प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करणे महत्वाचे आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला तर नक्कीच प्लाझ्मा डोनेशनच्या कार्याला हातभार लागू शकतो. कोरोनाच्या विरुद्ध लढण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यामध्ये आपण हातभार लावावा, असे आवाहन मी जरूर करेन.

श्री. शांतिलाल मुथ्था : भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून प्लाझ्मादानाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात आम्ही काय काम करू शकतो की जेणेकरून मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेप्रमाणे महाराष्ट्र हे एक नंबरचे राज्य बनू शकेल?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : राज्य शासन, भारतीय जैन संघटना आणि आमच्या लॅब असे आपण एकत्र येऊन मॉडेल तयार करता येईल. तुमची भूमिका प्रोत्साहन देण्याची आहे. एक चांगली व्यवस्था निर्माण करूया. आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन ज्याला प्लाझ्मा द्यायचाय आणि ज्याला घ्यायचाय त्याने तशी नोंद करावी. जे देणारे आहेत आणि जे घेणारे आहेत अशा दोघांनाही तुम्ही संपर्क करून आमच्याकडे सुपूर्द करा. प्लाझ्मादानामध्ये सुद्धा महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होईल. भारतीय जैन संघटनेचे यामध्ये योगदान असावं.

श्री. शांतिलाल मुथ्था: एकदा दिलेला प्लाझ्मा किती दिवसांपर्यंत आपण वापरू शकतो? एक वर्षापर्यंत तो राहू शकतो का?

आरोग्यमंत्री राजेश टोपे: प्लाझ्मा फ्रोजन करून ठेवण्याची पद्धत आहे. सध्या टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे त्या माध्यमाने आपल्याला हे करता येऊ शकेल.

श्री. शांतिलाल मुथ्था: थेट बऱ्या झालेल्या रुग्णाने दुसऱ्या रुग्णाला प्लाझ्मा दिला, जसं रक्तदान करतात. ते तर आपण त्वरित देतो आणि जर आपण फ्रोजन म्हणून त्याला जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो एक वर्षापर्यंत देता येतो.

आरोग्यमंत्री राजेश टोपे : ब्लड फ्रोजन करून ठेवता येत नाही. प्लाझ्माला जी एक प्रॉपर्टी आहे, त्याचा वापर आपल्याला प्लाझ्मा फ्रोजन करण्याच्या दृष्टीकोनातून करता येईल.

श्री. शांतिलाल मुथ्था : भविष्यात जरी आपल्याकडे अशी कुठली लाट आली तरी आपल्याकडे प्लाझ्माची बँक तयार असेल, जितकी जास्तीत जास्त तयारी असेल तितका त्याचा फायदा होईल. मी असं सुद्धा ऐकलेलं आहे की, आपण धारावीला आणि मालेगावला प्लाझ्मा बँक करणार आहात.

आरोग्यमंत्री राजेश टोपे : ज्या ठिकाणी नव्याने रुग्ण नाहीत तिथे सिरो सर्व्हेलन्स झाला आहे त्यामध्ये धारावीतल्या ५६ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांमध्ये आयजीज (IGG) चे प्रमाण म्हणजे न्यूट्रीलायझिंग अँटीबॉडीजचे प्रमाण आढळलेले आहे. याचा अर्थ तेथे डोनर्सची संख्या जास्त असू शकते. त्यामुळे प्लाझ्मा बँक तयार केली तर त्याचा रुग्णांना उपयोग होऊ शकतो.

श्री. शांतिलाल मुथ्था : जे लोकं अँटीबॉडी टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले ते देखील प्लाझ्मा दानासाठी पात्र आहेत का ?

आरोग्यमंत्री राजेशजी टोपे : होय. त्यासाठी अँटीबॉडी चाचण्या मोठ्या पद्धतीने घ्याव्या लागतील. महाराष्ट्रात आता साडेसहा लाख पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यातले पाच लाख बरे झाले. या पाच लाखांपैकी जे काही पात्र होतील. परंतु जे कदाचित ज्यांना इन्फेक्शन झालं, त्यातून ते बरे सुद्धा झाले, त्यांची यादी आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांना सिरो सर्व्हेलन्स करून लक्षात घ्यावे लागेल, यादी तयारी करावी लागेल आणि ते पण या पातळीत बसतात का ते बघावं लागेल, असतील तर त्यांचाही प्लाझ्मा आपल्याला घेता येईल.

श्री. शांतिलाल मुथ्था: िरो सर्व्हेलन्स म्हणजे नेमके काय ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : सिरो सर्व्हेलन्स हा एखाद्या समूहामध्ये किती संसर्ग झाला आहे याचं प्रमाण समजून घेण्यासाठी केलेला अभ्यास आहे. धारावीमध्ये १०० पैकी ५६ लोकांमध्ये आयजीजी अँटीबॉडीज सापडल्या. याचा अर्थ एवढाच आहे की प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास झालेली सुरुवात.

श्री. शांतिलाल मुथ्था : आता फक्त हे मुंबईमध्ये झालं तसं आतापर्यंत किती ठिकाणी सिरो सर्व्हेलन्स झालेले आहेत?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : सिरो सर्व्हेलन्स मुंबई, पुणे, मालेगाव नंतर आता औरंगाबादमध्ये काही प्रमाणात झाला आणखी काही हॉटस्पॉटमध्ये आपल्याला करता येऊ शकतो असा आमचा मानस आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.