आठवडा विशेष टीम―
विधानसभा उपाध्यक्ष श्री.झिरवाळ यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याची मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री अनिल भैय्या राठोड यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अनिल भैय्या यांनी लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरुन काम केले. लोकांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. नगर जिल्ह्यातून 25 वर्षे आमदार म्हणून निवडून येत असले तरी सामान्य कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. अनिल भैय्या यांच्या जाण्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांना आदरांजली वाहिली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, गरीब कुटुंबातून आलेले आणि राजकारणाचा कोणताही वारसा नसतानाही लोकप्रिय नेते म्हणून अनिल राठोड यांचे नाव घ्यावे लागेल. पाच वेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी कायम भर दिला.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरुन काम करणारे नेते अशी अनिल राठोड यांची ओळख होती.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल राठोड यांचे वेगवेगळ्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेशी संबंध होते. सर्वसामान्यांना न्याय मिळावा हा त्यांचा प्रयत्न असायचा. आताच्या लॉकडाऊन काळात त्यांनी सर्वसामान्यांसाठी अन्नछत्र सुरु केले होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सर्वश्री सुधाकर परिचारक, हरिभाऊ जावळे, सदाशिवराव ठाकरे, रामकृष्ण पाटील, सितलदास हरचंदानी, सुनिल शिंदे, श्यामराव पाटील, अण्णासाहेब उढाण, सुरेश पाटील, रामरतन बापू राऊत, मधुकर कांबळे, श्रीमती चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्तावही मांडला.