आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 7 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील गोरेगाव, मालाड-मालवणी भागातील पी उत्तर व पी दक्षिण क्षेत्रातील वाहतूक खोळंबणाऱ्या चौक, रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच जेथे रस्त्यांची गरज आहे, त्या ठिकाणी नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, बंदरे, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.
गोरेगाव व मालाड भागातील रस्त्यांची कामे, रुंदीकरण आदीसंदर्भात मंत्रालयात श्री.शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी महानगरपालिकेचे विजय बल्लमवार, सहायक आयुक्त एस. एस. काबरे, कार्यकारी अभियंता गिरीश निकम, वरिष्ठ वास्तुरचनाकार डी. आर बिडवे, सहायक आयुक्त (रस्ते) एस.पी. आंब्रे, यू. सी. कोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
गोरेगाव, मालाड-मालवणी भागात ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, अशा ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू करावीत. मिसिंग लिंक असलेल्या रस्त्यांवरील कामे तसेच आवश्यक तेथे नवीन रस्त्यांच्या कामाचा आराखडा सादर करावा. तसेच या भागातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणेही तत्काळ काढण्याच्या सूचना श्री. शेख यांनी यावेळी दिल्या.