प्रशासकीयब्रेकिंग न्युज

आरोग्याच्या कायमस्वरुपी सोयी-सुविधा उपलब्ध करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 8 : राज्यात आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्राधान्य देत आहे. त्याचबरोबरच नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विधानपरिषदेत केले.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे संकट लवकर जाणार नाही, अशा इशारा दिला आहे. त्यामुळे यापुढेही आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागेल. त्याचाच भाग म्हणून दोन टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असे मोहिमेचे दोन टप्पे असणार आहेत. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. सर्वांच्या सहभागाने ही एक राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार असून सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन कोरोनाशी दोन हात करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे.

आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती आणि विविध सामाजिक संस्था यांना सहभागी करून घेण्यासाठी, निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरीषदेत केले. विधानपरिषदेतील सर्व सदस्यांनी सहकार्य केले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.

आरोग्य सुविधा बळकट

कोविड-१९ च्या कठीण काळात आरोग्य सुविधा बळकट करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. शहरी व ग्रामीण भागात पुरेशी आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. राज्यात मार्चमध्ये केवळ तीन कोरोना चाचणी प्रयोगशाळा होत्या मात्र, कोविड संकट वाढत असल्याने, आता जवळपास 530 प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. मुंबईबरोबरच राज्यात आरोग्याच्या कायमस्वरुपी सोयी उभ्या केल्या जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.