सातपूर एम.आय.डी.सी. इमारतीतील गाळेधारकांच्या समस्यांबाबत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी साधला ऑनलाईन संवाद

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 9 : सातपूर, नाशिक येथील एम.आय.डी.सी. इमारतीतील गाळेधारकांच्या समस्यांबाबत उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी एम.आय.डी.सी. अधिकारी, गाळेधारक यांच्याशी ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला.

सातपूर, नाशिक येथील एम.आय.डी.सी. इमारतीचे शासकीय संस्थेद्वारे सात दिवसात संरचनात्मक लेखापरिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून घेण्याच्या सूचना राज्यमंत्री तटकरे यांनी एम.आय.डी.सी.च्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर तात्काळ बैठक घेण्यात यावी. लेखापरिक्षणानंतर नवीन इमारत बांधण्यापूर्वी गाळेधारकांना पर्यायी जागा द्यावी. त्यांचे उद्योग सुरू राहतील असे पहावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

एम.आय.डी.सी. सातपूर, नाशिक येथील 1973 मध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीचे अशासकीय संस्थेद्वारे संरचनात्मक लेखापरिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) केले असता ही इमारत धोकादायक असल्याचे सांगितले आहे. इमारतीमध्ये २८ गाळे असून २६ गाळ्यांमध्ये उत्पादन सुरु आहे.

या बैठकीस आमदार हेमंत टकले, एम.आय.डी.सी.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, प्रादेशिक अभियंता आदी उपस्थित होते.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.