प्रशासकीयब्रेकिंग न्युज

धानखरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करणार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 9 : सन 2020-2021 च्या खरीप हंगामातील धान /भरड धान्य खरेदीमध्ये जर गैरव्यवहार झाले असतील तर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंत्रालयात पणन हंगाम 2020-2021 मधील धान व भरडधान्य खरेदीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. भुजबळ बोलत होते.

श्री.भुजबळ म्हणाले, संबंधित जिल्ह्यांमध्ये होणारी धान खरेदी केंद्र शासनाच्या विहित निकषांनुसार होत आहे. याबाबतची खात्री जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करावी. तसेच धान खरेदीनंतर प्राप्त होणारा तांदूळ साठविण्यासाठी गोदामांची उपलब्धता सुनिश्चित करावी. हा तांदूळ लक्ष्य निर्धारित सार्वजनिक व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करावी. नाशिक जिल्ह्यातील धान खरेदी केली जाते मात्र तिथे मिलींग होत नाही याची दखल घ्यावी. पालघर, ठाणे, गडचिरोलीसाठी बेस गोडाऊनचा निर्णय घ्यावा. नवीन धानाच्या भरडाईचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करावे, तसेच गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा सक्षम करा. तांदुळाची गुणवत्ता तपासणीची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घ्यावी. सचिवांच्या नियंत्रणाखाली फ्लाईंग स्क्वॉड तयार करून मिलर्स व गोदामांची तपासणी करावी, असे निर्देशही श्री.भुजबळ यांनी दिले.

आढावा बैठकीत नवीन धानाच्या भरडाईबाबतचे व्यवस्थापन, गोदामांचे व्यवस्थापन, बारदाना खरेदी व पुरवठा याबाबतचे व्यवस्थापन, धान भरडाई करण्यासाठी मिलर्सची नेमणूक करण्यासाठी नवीन अटी व शर्ती तयार करणे, भरडाईची प्रतवारी चांगली ठेवण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करणे, बँक गॅरंटी असणाऱ्या मिलर्सना भरडाईचे काम देणेबाबत प्रती क्विंटल १.५ युनिट वीजवापराबाबत, राज्यातील कृषीउत्पादनाच्या आधारावर खरेदीचा अंदाज व जिल्हानिहाय गोदामांचे नियोजन करणे, धान/सिएमआर वाहतुकीबाबत, अॅडव्हान्स सीएमआर बाबत, छत्तीसगढ या राज्याच्या धर्तीवर ऑनलाईन खरेदी प्रक्रिया राबविणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, विभागाचे सचिव विलास पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप हळदे, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितिन पाटील, महसूल विभागाचे सहसचिव संतोष भोत्रे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.