‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवा – हसन मुश्रीफ

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 9 : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत राज्यात ग्रामीण भागात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज दिली.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याला अटकाव घालण्यासाठी ग्रामविकास विभागाची सर्व यंत्रणा संपूर्ण कोरोना संकटकाळात मोठ्या निर्धाराने काम करीत आहे. यापुढील काळातही या कोरोना योद्ध्यांनी या मोहिमेत योगदान देऊन कोरोनावर मात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंधरावा वित्त आयोग, उमेद अभियान यांसह ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, उपसचिव तथा उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण जैन आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ही मोहीम जाहीर केली आहे. या जनजागृती मोहिमेत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन त्यांचे सहकार्य घ्यावे, असे मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.

या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्यविषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे, स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने ही एक राज्यव्यापी मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.