राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरीमध्ये होणार आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र आणि सायन्स पार्क

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ९: अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वास्तव्याने पावण झालेल्या गुरुकुंज मोझरी (ता.तिवसा) येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र आणि विज्ञान उद्यान (सायन्स पार्क) उभारण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

आदिवासी विकास विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पंचायत राज व्यवस्थेतील लोकप्रतिनिधी, पेसा समन्वयक आणि बचत गट यांना प्रशिक्षण देण्याकरिता गुरुकुंज मोझरी, ता. तिवसा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्यस्तरीय प्रशिक्षण प्रबोधिनी येथील जागा ही आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेला उपलब्ध करुन देण्याबाबत आज ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर आदी अधिकारी उपस्थित होते.

मोझरी हे ठिकाण आदिवासीबहुल क्षेत्राच्या समीप असल्याने आदिवासी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींसाठी प्रशिक्षण देण्यास आदर्श ठिकाण राहील. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामविकासाच्या संकल्पना या भागात खोलवर रुजलेल्या आहेत. त्यामुळे येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे निश्चित केले आहे. त्याशिवाय ग्रामविकासाच्या संकल्पना राबविताना त्याला शास्त्रीय दृष्टीकोनाची जोड असावी या हेतूने येथे विज्ञान उद्यान (सायन्स पार्क) उभारण्यात यावा अशी भूमिका मंत्री ॲड. ठाकूर यांनी मांडली. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी सांगितले.

या कामाला गती देण्याच्या दृष्टीकोनातून पुढील आठवड्यात पालकमंत्री ॲड.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, आदिवासी विकास विभागाचे सचिव, अमरावतीचे विभागीय आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त, अमरावतीचे जिल्हाधिकारी यांची बैठक आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.