Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―अलिबाग,जि. रायगड, दि.9- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कराेनामुळे अकस्मात निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत प्रसारमाध्यम प्रतिनिधींची जिल्हा प्रशासनाकडून मोफत अँटीजन टेस्ट करण्याचे आदेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
सध्या कराेनाचे संकट सर्वत्र असून समाजासाठी काम करणाऱ्या प्रसारमाध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींचेही आरोग्य सर्वांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पातळीवर काम करणारे प्रसारमाध्यम प्रतिनिधी ते जिल्हा पातळीवर काम करणारे प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांची कराेना तपासणी करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच नोंदणीकृत सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींची मोफत अँटीजन टेस्ट करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.