प्रशासकीयब्रेकिंग न्युज

नागपूर फुटाळा तलाव येथे प्रस्तावित बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्पाचे सादरीकरण

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १०: नागपूर त्रिशताब्दी (१७०२-२००२) महोत्सव अंतर्गत विकासासाठी घेतलेल्या जागतिक दर्जाच्या बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्पाचे सादरीकरण राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आज करण्यात आले.

नागपूर येथील फुटाळा तलाव तेलंगखेडी येथे बौद्ध शिल्प उद्यानाचे प्रकल्प हे शताब्दी महोत्सव समितीच्या कार्यक्रमाअंतर्गत करण्यासाठी सन २००१ मध्ये तत्कालीन उत्तर नागपूर मतदारसंघाचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्याद्वारे पुढाकार घेण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पासाठी तत्कालीन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मौजे फुटाळा येथे अंदाजे ११२.५८ हेक्टर जागेवर बौद्ध शिल्प उद्यानाकरिता आरक्षित ठेवण्याचे ठरले होते.

प्रस्तावित बुद्धीस्ट थीम पार्क प्रकल्पाला अंदाजे १ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाकडे जगातील सर्व बुद्धिष्ट राष्ट्रे आकर्षित होणार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतील व यामुळे नागपूर हे पर्यटनाचे जागतिक केंद्र तयार होऊ शकेल.

या जागेची मालकी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे असून प्रकल्पासाठी ती संपादित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न चालू आहे. तसेच बौद्ध शिल्प उद्यान यात बदल करून याचे नामकरण बुद्धिस्ट थीम पार्क असे करण्यास नागपूर सुधार प्रन्यासाने यापूर्वीच निर्णय घेतला असून या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे करण्याचे प्रस्तावित केले आहे.

प्रस्तावित बौद्ध शिल्प उद्यानाचे सादरीकरण प्रसिद्द वास्तुविशारद अशोक मोखा यांनी केले. जागतिक बँकेचे सल्लागार रवी बनकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.