प्रशासकीयब्रेकिंग न्युज

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम प्रभावीपणे राबवा – उद्धव ठाकरे

आठवडा विशेष टीम―

ठाणे, दि. १० : राज्यशासनातर्फे आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. या सुविधेचा दर्जा उत्कृष्ट असुनही याबाबत जनतेच्या मनात साशंकता आहे. या सर्व जम्बो सुविधांबाबत जनतेच्या मनात विश्वासार्हता वाढविण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी प्रयत्न करावेत. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच सहा कोविड सेंटर्सचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास नवी मुंबई येथे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार यांसह नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रत्येक शहराच्या आवश्यकतेनुसार आपण सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहोत. राज्यात सुरूवातीच्या काळात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या प्रयोगशाळा होत्या. आज आपल्याकडे ५५० प्रयोगशाळा आहेत. मुंबई बरोबर संपूर्ण राज्यात पुरेशा आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. या सुविधा उभारल्या गेल्या असल्या तरी जनतेच्या मनात या सुविधांबाबत विश्वास निर्माण करावयाचा आहे. नामांकित खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून उपचारासाठी रुग्णालये दत्तक घेण्याबाबत विचारणा करावी अशा सुचना त्यांनी दिल्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला होता. मिशन बिगेन बरोबर वेगवेगळ्या गोष्टी सुरु करण्याबरोबर दक्षता समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशारानुसार आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढणारी लक्षात घेऊन राज्य सरकारने 80 टक्के ऑक्सिजन हॉस्पीटल व 20 टक्के ऑक्सिजन उद्योगसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्सिजनचे केंद्रीय पध्दतीने वाटप करण्यात येणार आहे. या संकटकाळात गेले सहा महिने आपण एकत्रितपणे मुकाबला केला. आजही आपल्याला सर्वाच्या सहकार्याने या विरुध्द लढा द्यायचा आहे.

गणेशोत्सव सर्वांनी संयमाने व शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार साजरा केला. परंतु याच काळात कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर आली आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम आता प्रभावीपणे राबवायची आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, मास्कचा वापर, सामाजिक सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे, याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याबरोबरच प्रत्येकाने स्वत: बरोबर कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे असे श्री. ठाकरे यांनी सांगितले. मनोधैर्य खचु न देता सर्व जनतेने शासन व प्रशासनाच्या सुविधांवर विश्वास ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकातर्फे निर्माण करीत असलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात चाचण्या करत असून कोरोनाची साखळी तोडण्यात यश येत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाफील न राहता प्रभावीपणे यंत्रणा राबविण्यात यावी. तात्काळ ट्रेसिंग वर भर द्यावा. सर्व सुविधायुक्त कोविडसेंटर हे रुग्ण केंद्रबिंदू मानुन उभारण्यात आले असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेने 200 बेड्ससह 80 व्हेंटिलेटर सुविधा, राधास्वामी सत्संग आश्रम सेक्टर 24 तुर्भे, निर्यात भवन, एपीएमसी मार्केट, सेक्टर 19, तुर्भेव एमजीएम रुग्णालय सेक्टर 30 सानपाडा वाशीयेथील एकूण 1003 ऑक्सिजन बेड्सची ‘ डेडिकेटेड हेल्थ सेंटर्स’ तसेच पाटीदार समाज भवन सेक्टर 15 ऐरोली येथील 302 बेड्सचे ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्तविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button