Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―मुंबई दि १० : मेळघाटकरिता ११ सुसज्ज रुग्णवाहिका मिळाव्यात, खावटी कर्ज सरसकट वितरित व्हावे यासह अमरावती जिल्हा बँकेतील रिक्त पदे भरण्यास मंजुरी, तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी महिला व बाल विकास मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.
दुर्गम भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत अमरावतीतील मेळघाटसाठी ११ सुसज्ज रुग्णवाहिका मिळाव्यात. खावटी कर्जाकरिता पात्र होण्यासाठी मनरेगामधे १०० दिवसांच्या उपस्थितीची अट आहे. सदर नियम मेळघाट भागाकरिता शिथिल करावा व सरसकट कर्ज मिळावे, अशी मागणी श्रीमती ठाकूर यांनी केली.अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेस ‘अ’ दर्जा प्राप्त आहे.
यामुळे आता शासकीय ठेवी घेण्याकरिता सदर बँक पात्र आहे. याबाबत आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत. तसेच नागरिकांना जलद सुविधा मिळणेकरिता बँकेतील रिक्त पदे भरण्यास तातडीने मंजुरी मिळावी, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली.अमरावतीतील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचे पिकावरील खोडकीड रोगाने मोठे नुकसान झाले आहे. या शेतकरी बांधवांना उभारी देण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, अशीही मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यातील विविध मागण्यांसह त्याबाबतची परिस्थिती श्रीमती ठाकूर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.