समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू ―अमित देशमुख

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

लातूर, दि. १४ : समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर तमाशा (लोकनाट्य) क्षेत्राला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने आज सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी मंत्री अमित देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

WhatsApp Image 2020 09 14 at 15.15.01

सध्याच्या कोरोना परिस्थितीत उत्सव, यात्रा पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे तमाशा लोककलावंताना आपले जीवन जगणे अवघड जात आहे. त्यांना शासनाने एखाद्या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे, राज्य शासनाने पूर्वीचे तमाशा अनुदान चालू करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने मंत्री अमित देशमुख यांना दिले. यावेळी श्री.देशमुख यांनी शिष्टमंडळाबरोबर सविस्तर चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या सर्व समस्या सोडवून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळातील सदस्यंना दिले.

या शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे, मोहित नारायणगावकर, सुनिल वाडेकर, संभाजी जाधव, आनंद भिसे-पाटील आदींचा समावेश होता.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.