प्रशासकीयब्रेकिंग न्युज

गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

आठवडा विशेष टीम―

गडचिरोली दि.14 : गोंडवाना विद्यापीठाने अंतिम परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेल माझ्या मते राज्यात अग्रस्थानावर आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते आज गडचिरोली येथे अंतिम परिक्षेच्या संदर्भात बैठक घेण्यासाठी येथे आले होते.

विद्यापीठाकडून परिक्षेसंबंधी झालेली तयारी, अडचणी तसेच इतर अनुषंगिक विषयावर मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन जिल्ह्यात केले होते. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ऑनलाईन परिक्षेबाबत तसेच ऑफलाईन (प्रत्यक्ष) परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेलची पाहणी केली. यामध्ये परिक्षा पद्धतीची निवड, अडचणी आल्यास पुन्हा परीक्षा तसेच अनुउर्त्तीण विद्यार्थ्यांबाबत पुन्हा संधी यातील नियोजन चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, संचालक परीक्षा व मुल्यमापन डॉ.अनिल चिताडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, सहायक जिल्हाधिकारी आशिष ऐरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील 17229 विद्यार्थी अंतिम परिक्षा देणार असून यामध्ये चालू वर्षीचे 15153 विद्यार्थी मागील वर्षी विषय राहिलेले 2013 विद्यार्थी तर बहिस्थ 63 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांना घरातूनच परिक्षा द्यावी असे प्राधान्य देण्यात आले होते. यानुसार 17229 पैकी 90 टक्के विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन परीक्षा देण्यासंदर्भात तयार झाले आहेत. तर 706 विद्यार्थी तांत्रिक अडचणीमुळे तसेच स्वत: निर्णय घेवून प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत. प्रत्यक्ष (ऑफलाईन) परिक्षा देणारे 706 विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी अडचणी निर्माण होवू नयेत म्हणून जिल्हाधिकारी यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.

परीक्षा असेल या प्रकारे

अंतिम परिक्षेआधी किमान 5 वेळा मॉक टेक्स्ट/चाचणी विद्यार्थ्यांची घेण्यात येणार आहे. यातून त्यांना परिक्षेसंबंधी प्रक्रिया लक्षात येईल. तसचे प्रत्येक अभ्यासक्रमाचा प्रश्न संच (Question Bank) ही वाटप करण्यात येणार आहे. अंतिम परिक्षेचा निकाल घोषित करतांना 50 टक्के परिक्षेचे गुण ग्राह्य धरणार आहेत. तर 50 टक्के इन्टरर्नलचे गुण ग्राह्य धरणार आहेत. ऑनलाईन परिक्षेमध्ये ऐनवेळी तांत्रिक अडचणी आल्यास विद्यार्थ्यांना 15 दिवसांनी पुन्हा संधी देण्यात येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही पुन्हा तातडीने परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरुन त्यांचे वर्ष वाया जाणार नाही.

विद्यापीठात डेटा सेंटर : विद्यापीठातील आवश्यक डेटा सेंटर तयार करणेबाबत वारंवार मागणी होती. त्याबाबत आम्ही तातडीने प्रशासकीय मंजूरी दिली आहे. यासाठी 2.45 कोटी देण्यात आले आहेत. सद्या या डेटा सेंटरचे काम सुरु झाले असून येत्या महिना अखेर पूर्ण होईल असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

विद्यापीठांच्या जागा खरेदीबाबत प्रश्नांवर चर्चा : विद्यापीठाच्या जागेच्या प्रश्नासह इतर भौतिक सुविधांचे प्रश्नही मार्गी लावण्यात येणार आहेत, असे मंत्री महोदयांनी सांगितले. परिक्षा केंद्र, प्रशासकीय इमारत यासाठी आवश्यक निधीही दिली जात आहे. 35 एकर जागेची खरेदी झाली असून अजून 15 एकर जागा खरेदी करण्यात येणार आहे. टप्पा 1 मधील विद्यापीठाच्या जमिन खरेदी करिताचे 79 कोटी शिल्लक असून सदर निधी विद्यापीठाच्या भौतिक संसाधन विकासासाठी वापरण्यात यावे असे सरकारतर्फे आश्वासन मिळाले आहे. मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन पुढील टप्पा-2 चे ही नियोजन मार्गी लागत आहे. यासाठी केंद्र स्तरावरुन निधी मिळविण्यासाठी केंद्र मंत्री नितीनजी गडकरी यांच्यामार्फत पाठपुरावा सुरु आहे असे ते म्हणाले.

50 एकरातील वेगळ्या व आधुनिक पद्धतीने काम करुन एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहे. टप्पा-1 व 2 चे पूर्ण काम झाल्यावर नक्कीच विद्यापीठ पाहण्यासाठी मुंबई किंवा परदेशातील लोक येतील.

आदिवासी व वन संशोधनावर आधारीत विद्यापीठ

आदिवासी अध्यासन, संशोधन व सशक्तीकरण असा विशेष जनाधार विद्यापीठाच्या व्हिजन व मिशनमध्ये अंतर्भुत करण्यात यावा. विद्यापीठ परिक्षेत्रातील अधिकतर भौगोलिक भुभाग वनसंपत्तीने व्यापलेला असल्यामुळे स्थानिक युवक व नागरिकांकरीता वनआधारित प्रशिक्षण, शिक्षण, संशोधन व उद्योजकता इत्यादी बाबतीत सहाय्यता प्रदान करण्याकरीता गोंडवाना विद्यापीठाचा केंन्द्रीयभुत विकास करणे.

सह संचालक केंद्र सुरु होणार

गडचिरोली व चंद्रपूर मधील शिक्षक, अधिकारी यांना वारंवार विद्यापीठात कामकाजासाठी नागपूर येथे जावे लागते. आता गोंडवाना विद्यापीठ भागातच सह संचालक केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यासाठी 2 अधिकारी, विद्यापीठाचे 2 सदस्य व शासकीय इंजिनिअरींग कॉलेजचे 2 सदस्य यांची नेमणूक त्यासाठी करण्यात येणार आहे. तसेच सह संचालक यांना 15 दिवसातून एकदा विद्यापीठात राहणे बंधनकारक केले जाणार आहे. यातून लोकांचे प्रश्न तातडीने सोडविले जाणार आहेत. असेही श्री.सामंत म्हणाले

मॉडेल कॉलेज

रातुम नागपूर विद्यापीठाचे मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठास हस्तांतरित करण्याकरिता सरकारचे पूर्ण सहकार्य असणार.

विद्यार्थ्यांना संदेश

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेसंबंधी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले विद्यार्थ्यांसाठी परिक्षेसंबंधी सर्व बाबी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी येणारी परीक्षा आनंदी वातावरणात पार पाडावी. ऑनलाईन तसेच ऑफलाईन (प्रत्यक्ष) परीक्षा पर्यायामुळे विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाहीत.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button