कोरोनाविरुद्ध लढाईत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिम महत्त्वाचे शस्त्र ठरेल

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―मुंबई, दि. १५ : कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिम एक शस्त्र ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

या संवादात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. एन.रामस्वामी, ठाण्याचे मनपा आयुक्त बिपीन शर्मा यांच्यासह मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका, नगरपालिकातील लोकप्रतिनिधी, मनपा आयुक्त, मुख्याधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात 15 सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यातील जनजीवन सुरळीत होत असतांना कोरोनाची साखळी तोडणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार असून आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी ही मोहिम महत्वाची असून लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी गाफील न राहता शेवटच्या माणसापर्यंत पोहचायचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपले कुटुंब सुरक्षित केल्यास पर्यायाने आपला महाराष्ट्र सुरक्षित होणार आहे. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून भविष्यात येणाऱ्या इतर महामारींच्या संकटांसाठी जनतेला तयार करण्याचे काम ही मोहिम करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरविकास मंत्री श्री.शिंदे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शेवटचा प्रहार आहे. या मोहिमेतून प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. शासनाने कोरोनापासून बचावासाठी आवश्यक आरोग्य सुविधा उभारण्याचे काम केले आहे. आता लोकसहभागातून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम सर्वांनी मिळून यशस्वी केल्यास इतर राज्यांसाठी ती अनुकरणीय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिनाभराच्या काळात राज्यभरात ज्या ठिकाणी ही मोहिम यशस्वीपणे राबविली जाईल त्या परिसरात निश्चित कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणता येऊ शकेल, असे मत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी व्यक्त केले.

मुख्य सचिव संजयकुमार यांनी ही योजनेच्या माध्यमातून विकसित होणारे मॉडेल येत्या काळात साथरोगांशी लढण्यात मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी योजनेच्या अंमलबजावणीची रुपरेषा थोडक्यात सांगितली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.