आठवडा विशेष टीम―
लातूर दि, १५ : शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा हे उत्पादन जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणाऱ्या केंद्र शासनानेच आता कांद्यावर निर्यातबंदी घालण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला आहे. हा निर्णय ताबडतोब परत घेऊन कांदा उत्पादकांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख योनी केले आहे.
कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाबाबत अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, कोणतीही पूर्वकल्पना न देता १४ सप्टेंबर रोजी केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय तडकाफडकी जाहीर केला आहे. या निर्यातबंदीमुळे थोडी भाववाढ होण्याची वाट पहात थांबलेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. उन्हाळ्यात कांद्याचे भाव पडलेले होते त्यातून उत्पादन खर्चही निघत नव्हता,त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री न करता त्याची साठवणूक करून ठेवली होती. या परिस्थितीत आता पुन्हा कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव एकाच दिवसात २५% टक्क्यावर खाली आले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग खूप मोठ्या अडचणीत आला आहे.
सद्यस्थितीत कांद्याचे भाव फारसे वाढलेले नसताना आणि निर्यातबंदी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नसताना केंद्र सरकारने असा निर्णय का घेतला ही बाब अनाकलनीय आहे, असे सांगून अनेक संकटामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने ही निर्यात बंदी ताबडतोब परत घ्यावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.