आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. १५ : जगभरात लॉकडाऊन असताना शेतीत खपून मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती, पण केंद्राने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
यासंदर्भात थोरात म्हणाले की, बाजारात मागील काही दिवसांत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले असताना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांनाही मोठा फटका बसला आहे. दरवाढ होत असल्याचे आशादायी चित्र बाजारात दिसत असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पल्लवीत झालेल्या आशा धुळीस मिळविल्या आहेत. प्रधानमंत्री यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून कांदा निर्यात बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना चार पैसे जादा कसे मिळतील हे पहावे, असे थोरात म्हणाले.