आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. १५ : खोपोली येथील टाटा स्टील बीएसएल कंपनीमार्फत सीएसआर निधीमधून रायगड जिल्ह्यासाठी दोन व्हेंटीलेटर देण्यात आले. राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हेंटीलेटर सुपुर्द करण्यात आले. रायगड जिल्हा पालकमंत्री कु.अदिती तटकरे कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.
मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या ह्या सीएसआर निधीमधून विविध उपाययोजना राबवत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या कामात महत्वपूर्ण योगदान देत आहेत.
पालकमंत्री कु.तटकरे यांनी सीएसआर योगदानासाठी कंपनीचे आभार मानले. जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबवित आहोत. व्हेंटीलेटरची खरे तर कोणाला गरज पडायला नको, पण तरीही दक्षता म्हणून जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठीच्या सर्व आवश्यक व्यवस्था करत आहोत, असे त्यांनी सांगितले.