आठवडा विशेष टीम―
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे उपजिल्हाधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लिकर, गणेश मिसाळ, कुंदमकुमार सोनवणे, रचना पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर व सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे स्वागत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. त्यानंतर जिल्ह्यातील महसूल व्यवस्थापनाची तोंडओळख तसेच मागील एक दीड वर्षात जिल्ह्यात झालेल्या उल्लेखनीय कामांबाबत सादरीकरण श्री मांढरे यांनी केले.
यावेळी बोलताना विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, मी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार घेतल्यानंतर विभागातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करत आहे. नाशिक जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे काम लोकाभिमुख असून त्यात डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रणालीचा प्रभावी वापर होत असल्याने प्रशासनाची कार्यक्षमता वाढत असतानाच तक्रारींचा जलद निपटारा होत असल्याचे सांगितले. गेल्या वर्षभरात नाशिक जिल्ह्यात मोठमोठ्या आपत्ती उद्भवल्या. त्यात पुर, वादळ, टंचाई यासारख्या समस्या सोडवत असताना कोरोना सारख्या साथरोगाच्या आपत्तीचाही सामना आपण प्रभाविपणे करत आहोत. तसेच सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणी व त्यासाठीच्या व्यवस्थापनात राज्यात नाशिक जिल्ह्यांच्या महसूल प्रशासनाच्या कामाची, सेवा हमी आयुक्तांनी प्रत्यक्ष भेटून प्रशंसा केली आहे. येणाऱ्या काळात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून सुरू झालेली मोहिम आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून महसूल प्रशासन यशस्वी करेल असा विश्वास व्यक्त श्री गमे यांनी व्यक्त केला. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीपूर्वी त्यांचे लाभ देण्याच्या उपक्रम विभागातील इतर जिल्ह्यांसाठीही अनुकरणीय व मार्गदर्शक असल्याचे सांगून येणाऱ्या काळात महाराजस्व अभियान व अन्य शासकीय उपक्रमाची अंमलबजावणी मध्ये देखील जिल्हा विभागात अग्रभागी राहील अशी खात्री असल्याचे श्री गमे यांनी नमूद केले.
कोरोना काळात महसूल उत्पन्न वाढ करणे व वसुल करणे हे आव्हानात्मक असून कुणालाही त्रास न देता रिकव्हरी करण्यासाठी नाशिक महानगर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्र साठी एक धोरण अंमलात आणण्याची योजना असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून जिल्ह्याच्या साधन-सुविधांच्या बळकटीकरणासाठी शाश्वत उपाययोजना आखता येतील असेही यावेळी श्री. गमे यांनी सांगितले.
डिजिटल प्रणालीचा वापर जनसेवेसाठी करण्यावर भर : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
सध्या सर्वत्र कोरोना साथरोगाने थैमान घातले असून अशाही परिस्थितीत जनजीवन व सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहण्यावर महसूल प्रशासनाचा भर असून लोकांना वारंवार तहसिल व उपविभागीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासू नये व कुठल्याही अडथळ्याशिवाय व सोशल डिस्टन्सीचे पालन तरून जनतेचे काम पारपाडण्यासाठी व्हाट्सॲप रिड्रेसल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काळात लोकांना या प्रणालीची माहिती व महत्व लक्षात आणून देण्यावर सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी भर द्यावा अशा सूचना यावेळी जिल्हाध्कारी सूरज मांढरे यांनी यावेळी दिल्या आहेत.
यावेळी बोलताना श्री. मांढरे म्हणाले. कोरोना नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही अत्यंत महत्वाची मोहिम सुरू झाली असून कोरोना आपत्ती नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना एकाचवेळी विविध विभागाच्या समन्वयाने या मोहिमेद्वारे करण्यात येत आहेत असेही श्री.मांढरे यांनी सांगितले.