आठवडा विशेष टीम―मुंबई दि. १६ : “कोरोना महामारीमुळे राज्यातील कलावंतांपुढे मोठे आव्हान उभे राहिले असल्याची जाणीव सरकारला असून सरकार सर्व कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील”, असा विश्वास सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कलावंतांच्या शिष्टमंडळाला दिला. फेडरेशन ऑफ आर्टिस्ट्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात श्री. यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले, त्यावेळी ते बोलत होते.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सभागृहे, नाट्यगृहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे कलाकारांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे,याची सरकारला जाणीव आहे. कलावंतांच्या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल”, असेही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री म्हणाले.
कलावंतांना शासनाकडून सहाय्य मिळावे, बिनव्याजी कर्जे, थिएटर सुरू करणे, विमाकवच, कलाकार नोंदणी अशा मागण्या यावेळी शिष्टमंडळाकडून करण्यात आल्या. शिष्टमंडळात मनोज संसारे, किशोर म्हात्रे, सुभाष जाधव, हरेश शिवलकर, संतोष परब, मेघा घाडगे इ. कलाकार, संघटक आणि कला व्यवसायाशी संबंधितांचा समावेश होता.