आठवडा विशेष टीम―
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण संख्येने दहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचे उदघाटन मंगळवारी झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुरवात केली आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात एकूण 467 पथके नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य विभागाची पथके धुळे जिल्ह्यातील 668 गावांतील तीन लाख 41 हजार 91 घरांना भेट देवून 16 लाख 85 हजार 89 नागरिकांची 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत तपासणी करतील. आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
तपासणीसाठी नियुक्त केलेले आरोग्य पथक दररोज किमान 50 घरांना भेट देतील. या घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेतील. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येणार आहे. तेथे कोविड 19 ची प्रयोगशाळा चाचणी करून पुढील उपचार केले जाणार आहेत. कोमॉर्बिड असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात किंवा नाही याची खात्री करण्यात येईल. तसेच आवश्यक तेथे औषधोपचारासाठी नागरिकांना संदर्भित करण्यात येणार आहे. प्रत्येक पाच ते दहा पथकांमागे एक वैद्यकीय अधिकारी उपचार व संदर्भ सेवा देतील. याशिवाय घरातील सर्व सदस्यांना प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगत त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहील. यात पहिली फेरी 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्ण होईल. दुसरी 14 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होईल. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी 10 दिवसांचा आहे.
कासारे प्राथमिक आरोग्य केंद्रात उदघाटन
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेचे आज सकाळी कासारे, ता. साक्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार श्रीमती गावित, उपविभागीय अधिकारी श्री. दराडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रवीण चव्हाणके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित साळुंखे, कासारे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती गावित यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार श्रीमती गावित म्हणाल्या, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळावे म्हणून राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेस नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास आगामी काळात आपल्याला सकारात्मक परिणाम पाहावयास मिळतील. साक्री तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची या मोहिमेच्या कालावधीत आरोग्य तपासणी करण्यात येईल. कोरोनाची प्रारंभिक लक्षणे दिसून येताच नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जावून तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन केले. उपविभागीय अधिकारी श्री. दराडे यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरलाच पाहिजे. अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. हात वेळोवेळी साबण, सॅनेटायझरने स्वच्छ करावेत, असेही आवाहन उपविभागीय अधिकारी श्री. दराडे यांनी केले.
00000