आठवडा विशेष टीम― वाशिम, दि. १६ : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. यासोबतच घरोघरी जावून प्रत्येक व्यक्तीची थर्मल गन व पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने तपासणी होणार आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे दिसून येतील, अशा व्यक्तींची कोरोना विषयक चाचणी केली जाईल. त्यामुळे कोरोना संसर्गाचे लवकर निदान व उपचार होणे शक्य होणार आहे. तसेच सदर बाधिताकडून इतरांना होणाऱ्या संसर्गावरही नियंत्रण येईल.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी, तसेच त्या नागरिकांची आरोग्य तपासणी होण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक असून सर्व लोकप्रतिनिधींनी या मोहिमेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले. तसेच जिल्ह्यात मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत १ हजार पथके तयार केली आहेत. आरोग्य विभागाचे हे पथक आपल्या गावात आल्यानंतर संबंधित गावाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांनी सुद्धा त्यांच्या सोबत राहून त्यांना सहकार्य करावे, असे पालकमंत्री श्री.देसाई यावेळी म्हणाले.
टेस्टिंग वाढवा, अतिरिक्त सुविधा निर्मितीला गती द्या
जिल्ह्यात सद्यस्थितीत ऑक्सिजन बेडची संख्या पुरेशी असली तरी वाढती रुग्ण संख्या लक्षात घेवून या सुविधेतही वाढ करण्याबाबत सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यानुसार आवश्यक सुविधा निर्मितीचा आराखडा सादर करावा. एकाच ठिकाणी जास्त संख्येने बेडची सुविधा निर्माण करण्यापेक्षा विकेंद्रित स्वरुपात सुसज्ज सुविधा तयार करावी. आवश्यक डॉक्टर, नर्स व इतर मनुष्यबळ तसेच औषधे, सामग्रीचा पुरेसा साठा सज्ज ठेवावा, असे पालकमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले. आरटीपीसीआर लॅब उभारण्याच्या कामाला गती द्यावी. रॅपिड अँटीजेन टेस्टची संख्या वाढवून जास्तीत जास्त कोरोना बाधितांचा वेळेत शोध घेवून त्याच्यावर उपचार सुरु करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दया
जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन बेड तसेच त्यापैकी वापरत असलेले आणि रिक्त असलेले बेड याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन स्वरुपात उपलब्ध होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने ‘डॅशबोर्ड’ची निर्मिती करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
जि. प. अध्यक्ष श्री. ठाकरे म्हणाले, ग्रामीण भागात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी इतर शासकीय विभागाच्या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना सुद्धा या मोहिमेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. गावातील पदाधिकारी यांनी आपल्या गावामध्ये सातत्याने नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांची माहिती देणे आवश्यक आहे.
आमदार पाटणी म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी जनजागृती गरजेची असून या मोहिमेत सर्व प्रशासकीय यंत्रणांना सहभागी करून मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे ध्येय ठेवावे. भविष्यात जिल्ह्यातील आरोग्य विभागावर अधिक भार पडणार असल्याने या विभागातील सर्व पदे भरून मनुष्यबळ वाढवावे. तसेच कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री.मोडक यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थितीची माहिती दिली. श्री. गोटे म्हणाले, श्री. पाकधने यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
*****