Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―मुंबई, दि. 16 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधानांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छासंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, स्वतंत्र भारतात जन्म झालेले आपण देशाचे पहिले पंतप्रधान आहात. भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान होण्याचं भाग्य आपल्याला दोनदा लाभलं आहे. आपली पंतप्रधानपदी झालेली निवड ही आपल्यावरील देशवासियांच्या दृढ विश्वासाचं तसंच आपल्याकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षांचं प्रतिक आहे. देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करुन त्याचा विश्वास सार्थ ठरविण्याचं बळ आपल्याला मिळो. पंतप्रधान म्हणून आपल्या नेतृत्वाखाली भारत देश पुन्हा एकदा कोरोनासह आर्थिक, सामाजिक संकटांवर यशस्वीपणे मात करुन विकासाच्या मार्गावर दमदारपणे वाटचाल करील. असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा देतांना व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्याही पंतप्रधान म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता होईल. महाराष्ट्राला तसेच समस्त देशवासियांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून होईल, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.