ऑनलाईन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी मोबाईल टॉवर जोडणीला प्राधान्य द्यावे – छगन भुजबळ

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नाशिक : कोरोनाविषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणपध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषदेने मोबाईल टॉवर जोडणीच्या कामांना प्राधान्य द्यावे,असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या बैठकित पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर,आमदार डॉ.नितीन पवार, आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, मालेगावच्या महापौर ताहेरा शेख, उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, माध्यमिक शिक्षण अधिकारी वैशाली झनकर, प्राथमिक शिक्षण अधिकारी राजीव म्हसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ.कपिल आहेर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, कोरोनाकाळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,यासाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरु करण्यात आली. ग्रामीण भागात व आदिवासी भागात नेटवर्कची समस्या असल्याने तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ पुरेशा प्रमाणात घेता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मोबाईल टॉवरच्या जोडणीचे काम प्राधान्याने करण्यात यावे. तसेच जिल्हा परिषद शाळांबरोबरच खाजगी शाळेतही सुरु असलेल्या ज्ञान दानाचा कामाचा आढावा शिक्षण विभागाने वेळोवेळी घ्यावा. याबरोबरच आंतरजिल्हा बदली होवून गेलेल्या शिक्षकांच्या जागेवर नव्याने आलेल्या शिक्षकांनाही तत्काळ रुजू करुन घेण्याबाबतची सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

nk meeting

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती तसेच अतिरिक्त वर्ग खोलीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीबाबत पाठपुरावा करण्यात येईल,तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या वर्ग खोल्यांचे नुकसान झालेले आहे त्याकडेही लक्ष देवून दुरुस्त्या करुन घेण्याबाबतचे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना ‍ श्री. भुजबळ यांनी दिले.

कोरोनाच्या काळात शाळा बंद असतांनाही जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना शिक्षण पोहचविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहे. त्यामध्ये तंत्रसेतू ॲप, व्हाटसॲप, ऑनलाईन झुम, जिओ मीट, गुगल क्लासरुम इत्यादी वापरण्यात आलेली ऑनलाईन माध्यमांचा प्रभावी वापर केला. परंतु त्याचबरोबर ज्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण देता येवू शकत नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन ओट्यावरच्या शाळा, गल्ली मित्र, गृहभेटी सारखे स्तुत्य उपक्रम राबविल्याचे सांगून पालकमंत्री श्री. भुजबळ शिक्षण विभागाचे कौतुकही केले.

कोरोनाचा वाढत प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्येही या आजाराविषयी जनजागृती व्हावी यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक शिक्षकाने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मुखपट्टीचा वापर , वांरवार हात सॅनिटाईस करण्याबाबतची जनजागृती करावी, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

15 व्या वित्त आयोगाच्या निधी मधून शाळा दुरुस्तीचे नियोजन: लीना बनसोड

जिल्हा परिषदेची 327 अतिरिक्त वर्ग खोलींची मागणी असून 1 हजार 765 शाळेंच्या वर्ग खोलींची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या दुरुस्त्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधी मधून करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये इमारतींचे काम, स्वच्छतागृह, पिण्याचे पाण्याची सोय व विद्युतीकरणाची कामे करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.