एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही असे नियोजन करा ―उदय सामंत

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

जळगाव दि. 18 – अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याप्रमाणे विद्यापीठाने परीक्षांचे नियोजन करावे. असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परिक्षांसंदर्भात केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आज विद्यापीठात पार पडली यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले.

या बैठकीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, कुलगुरु प्रा. डॉ. पी. पी. पाटील, प्र कुलगुरु पी. पी. माहुलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटक्के, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता, डॉ. ए. बी. चौधरी, उच्च्‍ शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा. सतीश देशपांडे, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. पी. डी. नाथे, परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील, सिनेट सदस्य विष्णू भंगाळे आदि उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन देणार याचा पर्याय लवकरात लवकर घेऊन त्याप्रमाणे परीक्षांचे नियोजन करावे. ऑफलाईनचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळचे परिक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात यावी. याकरीता त्यांना येण्या-जाण्यासाठी वाहतुक व्यवस्थेचेही नियोजन करावे लागेल. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर आणण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागेल. कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करुन द्यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने जे विद्यार्थी काही कारणामुळे परिक्षा देवू शकणार नाही त्यांचेसाठी पुन्हा एक संधी म्हणून स्वतंत्र परिक्षेचे आयोजन करावे. यावर्षी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र हे पूर्वीप्रमाणेच राहील याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्वरीत परिक्षा घेण्याबाबतचेही नियोजन विद्यापीठाने आतापासूनच करुन ठेवावे. यावर्षी पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देणाऱ्या आस्थापनांकडून वेगळी वागणूक दिल्यास त्यांचेवर कारवाई करण्याचा इशाराही मंत्री ना. सामंत यांनी यावेळी दिला.

विद्यापीठात संत साहित्य अध्यासन केंद्र सुरु करण्यास लवकरच मंजुरी देणार

यावेळी कुलगुरु प्रा. पाटील यांनी विद्यापीठाचे शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती दिली असता विद्यापीठाचे सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल. असे सांगून मंत्री ना. सामंत म्हणाले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी आवश्यक असलेला निधी लवकरच देण्यात येईल. त्याचबरोबर संत मुक्ताई, संत चांगदेव यांच्या साहित्याच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा याकरीता विद्यापीठात संत साहित्य अध्यासन केंद्र सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला असून त्यास लवकरात लवकर मंजूरी मिळण्यासाठी मी स्वत: पाठपुराव करीत असल्याचे पालकमंत्री ना. पाटील यांनी निदर्शनास आणून देताच त्यास लवकरच मंजूरी देण्यात येईल. असेही ना. सामंत यांनी यावेळी सांगितले.

काेरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना नजीकचे परीक्षा केंद्र मिळावे – पालकमंत्री

ऑफलाईन परिक्षेचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन आवश्यक असणाऱ्या परिक्षा केंद्राची संख्या तसेच परिक्षा घेण्याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने तातडीने जिल्हा प्रशासनास सादर करावा. जेणेकरुन प्रशासनास त्याप्रमाणे तयारी करता येईल असे पालकमंत्री ना. पाटील यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना प्रवासाची अडचण येवू नये याकरीता अशा विद्यार्थ्यांना नजीकचे परिक्षा केंद्र विद्यापीठाने उपलब्ध करुन देण्याची सुचनाही त्यांनी केली. त्याचबरोबर कवयित्रि बहिणाबाई चौधरी यांच्या मुळगावी होत असलेल्या स्मारकासाठी विद्यापीठाने मदत करावी. खानदेशातील संतांच्या साहित्याचे जोपासना व्हावी याकरीता विद्यापीठाने कार्यवाही करण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

यावर्षी विद्यापीठातंर्गत 53 हजार 564 परिक्षार्थी अंतिम वर्षाच्या परिक्षेसाठी असून आतापर्यंत 41 हजार 878 विद्यार्थ्यांनी ऑनलाईनचा तर 4 हजार 435 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परिक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे. यामध्ये 272 विद्यार्थी दिव्यांग आहेत. या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण न येता व त्यांची सुरक्षितता जपुनच परिक्षा घेतल्या जातील तसेच यावर्षीच्या विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा तर पुढील शैक्षणिक वर्षीची शुल्क वाढ स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याचे कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.