प्रशासकीयब्रेकिंग न्युज

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तयार होणाऱ्या उपबाजार आवारात स्थानिकांना प्राधान्य द्या : पालकमंत्री छगन भुजबळ

आठवडा विशेष टीम―

नाशिक दि. 18 : त्र्यंबकेश्वर येथे शेतकऱ्यांसाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत उपबाजार आवार तयार करण्यात येत आहे. या आवारात तयार होणाऱ्या इमारतीत परवडेल अशी अमानत रक्कम निश्चित करुन गाळे वाटप किंवा इतर सुविधांचा लाभ देतांना स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथील नाशिक कृषी उत्पन् बाजार समितीच्या अंतर्गत ‘त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या’ भुमिपुजन आणि कोनशीला अनावरण कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जि.प.अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, नाशिक कृषी उपन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, उपसभापती युवराज कोठुळे, नगराध्यक्ष पुरषोत्तम लोहगांवकर, त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे सभापती मोतीराव दिवे, गटविकास अधिकारी मुरकुटे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, त्र्यंबकेश्वर तालुकात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून भविष्यात आदिवासी समाजाला रोजगाराची संधी या आवाराच्या माध्यमातुन निर्माण होणार आहे. त्यामुळे पिकविणाऱ्या शेतकऱ्याला विकण्याची संधी कृषी उत्पन्न बाजार समितीने उपलब्ध करुन द्यावी. तसेच या बाजार आवारामुळे या तालुक्यातील जवळपासच्या शेतकऱ्यांचा दळण वळणाचा मोठा प्रश्न सुटणार असून स्थानिक पातळीवरच त्यांच्या माल विकला जाणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

लॉकडाऊन काळात सगळे बंद असून देखील शेतीचे कामे ॲनलॉक होती. त्यामुळे येणाऱ्या काळातील सोशल डिस्टन्सिंगचे महत्व लक्षात घेवून शेतकऱ्यांसाठी अशा छोट्या छोट्या स्वरुपाचे बाजार सुरु होणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या अनुषंगाने बंदिस्त बाजारा पेक्षा खुली बाजार पध्दती सुरु करावी आणि मुंबई महामार्गालगत खुल्या मैदानावर शेतकरी विकत असलेला माल विकू देण्याची सूचना पोलिसांना केली. येणाऱ्या काळात टर्मिनल मार्केट तयार करण्यासाठी व पॅकींग पध्दतीकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

कांदा प्रश्नी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्रित येऊन कांद्याची निर्यात सुरु करण्यासाठी केंद्र सरकारला निवेदन देणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

आदिवासींना व्यापारात उतरण्याची संधी द्यावी :- उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

नाशिक कृषी उत्पन् बाजार समितीच्या अंतर्गत ‘त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या’ माध्यमातून कमी अनामत रक्कम घेऊन आदिवासींनादेखील या व्यापारात उतरण्याची संधी द्यावी. तसेच बाजार आवार उभारण्याबरोबरंच शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीज व पाणी उपलब्ध झाले तर बाजार समितीत शेतमाल येण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे मत, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button