आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. १८ : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून सुरू झालेला जयसिंगपूर पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल असे गौरवोद्गार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी काढले. जयसिंगपूर येथे राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे.
जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या संकल्पनेतून राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन तसेच शिरोळ तालुक्यातील, जयसिंगपूर परिसरातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या सौजन्याने सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट सभागृह जयसिंगपूर येथे हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी केलेल्या या विशेष प्रयत्नामुळे शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांना तातडीने आणि योग्य उपचार मिळू शकतील.
यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व मान्यवर उपस्थित होते.