डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी आता दहा हजार क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची भर  

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नांदेड दि. 18 :- जिल्ह्यातील जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण अग्रही होते. त्यांच्या दूरदृष्टीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय साकारले असून येथील सुविधेबाबत मी कायम दक्ष आहे. लोकसेवेतील त्यांच्या भावना व नांदेड जिल्हावासियांबद्दल त्यांनी जपलेली कटिबद्धता ही तितक्याच तळमळीने जपून यासाठी जो काही निधी लागेल तो मी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना बाधित रुग्णांना गरजेप्रमाणे ऑक्सीजन व इतर अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने विस्तारीत 10 हजार क्षमतेच्या लिक्वीड ऑक्सीजन टँकचे लोकार्पण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अधिष्ठात डॉ. सुधिर देशमुख, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदींची उपस्थिती होती.

मार्चपासून मी नांदेडमधील वैद्यकीय सेवा-सुविधांबाबत शासनस्तरावर अग्रही भूमिका घेत विकास कामांचे नियोजन केले आहे. यातूनच जिल्हा रुग्णालयातील दोनशे खाटांच्या बाह्य रुग्णालयाचा विस्तार व इतर शासकीय रुग्णालयांसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री, सिटीस्कॅन सारख्या सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केल्या आहेत. यापुढेही अधिकाधिक नियोजन करु असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आता व्हीआरडीएल लॅब व प्लाझमा थेअरपीसह सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यात आले असून आवश्यक तो औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांनी दिली. कोरोना बाधित जे गंभीर रुग्ण आहेत त्या गंभीर रुग्णांसाठी 110 खाटा मोठ्या प्रमाणात दिलासा देणार असल्याचे सांगत यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ. देशमुख पालकमंत्र्यांचे आभार मानले. रुग्णांच्या सेवेसाठी याठिकाणी 400 पेक्षा अधिक नर्सींग स्टॉफ व विविध विभागांचे तज्ज्ञ सर्वस्व अर्पूण रुग्णांना सेवा देत असल्याचेही त्यांनी सांगीतले.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना अधिकाधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत व शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून आता अतिदक्षता विभागाच्या नवीन 110 खाटांचे दोन वार्ड कार्यान्वित करण्यात आले आहे. याचे प्रातिनिधीक लोकार्पणही पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते दि. 17 सप्टेंबर रोजी करण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.