आठवडा विशेष टीम―
सोलापूर, दि. 23 : सोलापूर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ झाला असून कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने स्वत:बरोबर कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन करून या जनजागृतीबाबत आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ची शपथ दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, अरूणा गायकवाड, अनिल कारंडे, प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वत: माझ्या कुटुंबात, परिसरातील लोकांना मास्क लावणे, आपापसात दोन मीटरचे अंतर ठेवणे, साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टीसाठी प्रेरित करेन. कोरोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार किंवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने व सद्भावाने वागेन. कोरोनाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले डॉक्टर, नर्स, रूग्णालयातील कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, सर्व कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी शपथ देण्यात आली.
यावेळी श्री. शंभरकर म्हणाले, कोरोनाचा प्रतिबंध कसा करायचा हे सर्वांना माहित झाले आहे. मात्र आपण दुसऱ्याशी भेदभाव न ठेवता कसे वागावे, याची जाणीव या शपथेमधून होते. आपण स्वत:सह कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्याशी सौजन्याने वागण्याची जाणीव सहकारी आणि कुटुंबियांना करून द्यायला हवी.
श्री. जाधव म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्याबरोबर कुटुंबातील घटकांना सुरक्षित राहण्याची जाणीव व्हावी. कुटुंबाचा घटक म्हणून त्यांची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मोहिमेबाबतची माहिती समाजात रूजण्यासाठी शपथ घेणे गरजेचे आहे.
श्री. देशमुख म्हणाले, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आरोग्य पथक प्रत्येकाचे घरी दोनवेळा येऊन माहिती घेणार आहे. सर्वांनी पथकाला सहकार्य करावे. मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे. आरोग्य पथक प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. मधुमेह, ह्रदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार याविषयीची माहिती घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येणार आहेत.
श्रीमती भोसले म्हणाल्या, प्रत्येक महिलांनी स्वत:बरोबर घरातील महिलांची काळजी घ्यावी. महिलांच्या समस्या वेगळ्या असल्याने त्यांच्यामध्ये या मोहिमेमधून जागृतीचे काम होणार आहे.