प्रशासकीयब्रेकिंग न्युज

माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत जळगाव शहर महानगर पालिकेच्यावतीने एक लाख ३५ हजार नागरिकांची तपासणी

आठवडा विशेष टीम―

जळगाव, दि. 22 – कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या आतापर्यंत 134 आरोग्य पथकांमार्फत शहरातील 39 हजार 27 घरातील एक लाख 35 हजार 317 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम 15 सप्टेंबर, 2020 पासून सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी, ता. जळगाव येथे करण्यात आला. जळगाव शहरातील नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने 134 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व संघटनांनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 घरांना भेटी देत असून ही पथके घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येत असून तेथे कोविड 19 च्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी घेण्यात येवून पुढील उपचार केले जात आहेत. जळगाव शहरात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम महानगरपालिकेचे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक यांच्या सहकार्याने दोन टप्प्यात 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. यात पहिली फेरी 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी हा 10 दिवसांचा राहणार असल्याचे आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

जळगाव शहरात नवीपेठ, शिवाजीनगर, सुभाषचौक, जुनेगाव, इंडिया गॅरेज, तांबापूरा, गावठाण, पिंप्राळा, हरी विठ्ठल नगर आणि सुप्रीम कॉलनी असे दहा आरोग्य विभाग कार्यरत आहेत. या दहा विभागात महापालिका प्रशासनाच्यावतीने 134 आरोग्य पथके कार्यरत करण्यात आली आहे. या पथकांमार्फत शहरात आतापर्यंत 39 हजार 27 घरांना भेटी दिल्या असून 1 लाख 35 हजार 317 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 50 वर्षे वयावरील व्यक्तींची संख्या 24 हजार 826 इतकी आहे. यापैकी 3 हजार 943 व्यक्ती या कोमार्बिड, सर्दी, ताप, खोकला (ILI) चे 47 तर सारीचे 10 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 49 संशयितांना तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यापैकी 19 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 50 वर्षाखालील व्यक्तींपैकी 606 व्यक्ती कोमॉर्बिड, सर्दी, ताप, खोकला (ILI) चे 37 तर सारीचा 1 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 27 संशयितांना तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यापैकी 6 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ रावलानी यांनी दिली.

नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यास त्वरीत रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button