अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील स्वामी विवेकानंद बालविद्यामंदीर शाळेच्या विद्यार्थ्यांनी थँक्स-अ-टीचर अंतर्गत विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन करीत अंबाजोगाईचे नांव शैक्षणिक क्षेत्रात उंचावल्याबद्दल त्यांचे अंबाजोगाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून निकालाचे स्वागत करून विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
समग्र शिक्षा,जिल्हा परिषद,बीड यांचे वतीने थँक्स-अ-टीचर अंतर्गत विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल सोमवार,दिनांक
21 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला.कोविड-19 या रोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शिक्षक दिन नेहमीप्रमाणे साजरा करणे शक्य नसल्यामुळे थँक्स-अ-टीचर या मोहिमे अंतर्गत 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दल भावना व्यक्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.या मोहिमे अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याचा एक भाग म्हणून मंगळवार,दि.15 सप्टेंबर 2020 रोजी इ.1 ली ते 8 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या 1 ली ते 5 वी व 6 वी ते 8 वी या दोन गटात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. परिक्षकांच्या अहवालानुसार निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात प्राथमिक गटात (इ.1 ली ते 5 वी) अंबाजोगाईच्या स्वामी विवेकानंद बालविद्या मंदिर या शाळेची इयत्ता पाचवी वर्गातील विद्यार्थीनी कु.स्वरा राहूल शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर याच शाळेची इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थीनी कु.शिवानी पांडुरंग गिरी हिने उच्च प्राथमिक गटात (इ.6 वी ते 8 वी) तृतीय क्रमांक पटकावला आहे.स्वामी विवेकानंद बालविद्यामंदीर शाळेच्या विद्यार्थ्यांनी थँक्स-अ-टीचर अंतर्गत विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन करीत अंबाजोगाईचे नांव शैक्षणिक क्षेत्रात उंचावल्याबद्दल त्यांचे अंबाजोगाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी यांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे.