प्रशासकीयब्रेकिंग न्युज

शेवटच्या माणसाला जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे – न्यायमूर्ती भूषण गवई

आठवडा विशेष टीम―

गोंदिया दि.26 : विधी पालिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका ह्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निर्माण झाल्या आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या इमारतीतून जिल्ह्यातील शेवटच्या माणसाला जलदगतीने न्याय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

आज गोंदिया येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन आभासी पद्धतीने न्यायमूर्ती गवई यांनी केले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात आभासी पद्धतीने मुंबई येथून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती नितीन बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी गोंदिया येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.टी.बी.कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्यायमूर्ती गवई पुढे म्हणाले की, गोंदिया आणि माझा जुना संबंध आहे. 1997 मध्ये मी न्यायालयीन कामकाजासाठी अनेकदा गोंदियाला गेलो. अनेकदा तिथे मुक्काम देखील केला. तेथील अनेक वकिलांसोबत मला जवळून काम करण्याची संधी मिळाली. गोंदियाच्या वकिलांना सामाजिक कार्याचा वसा आहे. ॲड. छेदीलाल गुप्ता हे त्यापैकीच एक होते. न्यायमूर्ती बोरकर यांची गोंदिया ही मातृभूमी आहे. या कार्यक्रमातून यांच्या सत्काराचे आयोजन करण्याचे ठरले होते, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नाही. न्यायमूर्ती गिरडकर यांचे या विस्तारित इमारत उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. मी या इमारतीच्या भूमिपूजनाला देखील होतो. आज उद्घाटन समारंभाला देखील उपस्थित आहे. हे माझे भाग्य आहे. ही इमारत सुसज्ज झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदाराने अत्यंत चांगल्या पद्धतीने ही इमारत बांधली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना या इमारतीतून न्याय मिळेल असे ते म्हणाले.

न्यायमूर्ती दत्ता म्हणाले, जिल्हा व सत्र न्यायालयाची ही विस्तारित इमारतीसाठी जागा मिळण्यापासून अनेक अडथळे आले. त्यावर तोडगा निघून अखेर जागा उपलब्ध झाली. न्यायमूर्ती गिरडकर हे गोंदिया येथे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश असतांना त्यांनी या विस्तारित इमारतीसाठी लागणाऱ्या जागेपासून तर इमारत पूर्ण होईपर्यंत लक्ष दिले. न्यायमूर्ती गवई यांच्या पुढाकारामुळे ही वास्तू आज साकारली आहे. इमारतीचे बांधकाम चांगल्या गुणवत्तेचे असून फर्निचर सुद्धा चांगले आहेत. चांगल्या सुविधा या इमारतींमध्ये निर्माण करण्यात आल्या आहे. विस्तारित इमारतीमुळे न्यायिक अधिकारी व वकील बांधवांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या इमारतीमध्ये नियमांचे सर्वांनी पालन करावे. अनेकांना या इमारतीतून न्याय मिळण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

न्यायमूर्ती देशपांडे म्हणाले, गोंदिया येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची ही विस्तारित इमारत पूर्ण होण्यामागे न्यायमूर्ती गिरडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. न्यायिक अधिकारी, वकील मंडळी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या इमारतींमुळे सुविधा निर्माण होण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले.

न्यायमूर्ती बोरकर म्हणाले, आज या विस्तारित इमारतीचे उद्घाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे. अतिशय सुसज्ज अशी इमारत तयार झाली आहे. या जागेसाठी जनहित याचिका दाखल करावी लागली. या इमारतीमध्ये असलेल्या लिफ्ट सुविधेमुळे वरिष्ठ वकिलांना कामानिमित्त येण्या-जाण्यासाठी आधार झाला आहे. गोंदिया ही आपली मातृभूमी असल्यामुळे येथे वकील म्हणूनही आपण काम केल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलतांना न्यायमूर्ती गिरडकर म्हणाले, विस्तारित इमारतीच्या उद्घाटनामुळे माझे आज स्वप्न पूर्ण झाले आहे. जुनी इमारत ही अपुरी पडत असल्यामुळे विस्तारित इमारतीची आवश्यकता होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून येथे काम करीत असताना या जागेसाठी पाठपुरावा केला. अनेक अडथळे आले, त्यावर मात करून अखेर जागा उपलब्ध झाली. काही महिन्यांच्या कालावधीतच या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ही इमारत आता लोकांच्या सेवेत रुजू होत असल्याचा आनंद आपल्याला झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री माने म्हणाले, ही इमारत उभी राहण्यासाठी न्यायमूर्ती गिरडकर यांनी बीजारोपण कार्य केले. त्यांच्या योगदानातून ही इमारत उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी न्यायालयांच्या इमारती झाल्या पाहिजे यासाठी न्यायमूर्ती गिरडकर यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. टी.बी.कटरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन न्यायाधीश एन.आर.वानखडे व न्या.श्रीमती मालोदे यांनी केले. उपस्थितांचे आभार न्यायाधीश शरद पराते यांनी मानले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना, न्यायिक अधिकारी, वकील वर्ग व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक आर.जी.बोरीकर, सहायक अधीक्षक महेंद्र पटले, नरेंद्र टेंभरे, एम.आर.कटरे, श्री लिल्हारे, सी.ए.कनव्हे, व्ही.पी.बेदरकर व बी.डी.बडवाईक यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button