प्रशासकीयब्रेकिंग न्युज

पर्यटन विकासातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील – यशोमती ठाकूर

आठवडा विशेष टीम―अमरावती, दि. २७ : अमरावती जिल्हा निसर्गसंपदेने नटलेला आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या शक्यता लक्षात घेता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने अमरावती टुर्स आणि टुरिझम असोसिएशनच्या सूचनाही विचारात घेण्यात येतील. वन व कृषी पर्यटन विकासातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला.

अमरावती टुर्स व टुरिझम असोसिएशनतर्फे जागतिक पर्यटनदिनानिमित्त पर्यटन व ग्रामीण विकास या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. देशविदेशातील पर्यटन व्यावसायिक व तज्ज्ञ या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मलेशिया येथून प्रसाद चंद्रा, नरेश रावल, हरमन सिंग आनंद, संघटनेचे अध्यक्ष बबन कोल्हे, संजय हेमनानी, दिनेश अग्रवाल, डॉ. अंजली ठाकरे यांनी सहभाग घेतला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मेळघाट व वनसंपदेने नटलेल्या अमरावती जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या अनेक शक्यता आहेत. त्यानुसार ठिकठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने उपक्रम राबविण्याची गरज आहे. कौंडण्यपूरसारखी अनेक धार्मिक व निसर्ग संपन्न स्थळे जिल्ह्यात आहेत. अशा विविध ठिकाणी पर्यटन विकासाच्यादृष्टीने येणाऱ्या सूचनांचा विचार करण्यात येईल.

त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण विकासाच्या दृष्टीने राज्यात कृषी पर्यटन धोरण राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पर्यटनाच्या अनुषंगाने कृषी क्षेत्रात एक चांगला पूरक व्यवसाय उभा राहू शकेल, तसेच नागरिकांनाही शेती, कृषीसंस्कृती, निसर्गरम्य वातावरण हे अनुभवण्याची संधी मिळेल, या हेतूने हे धोरण आखण्यात आले आहे. अमरावतीसारख्या निसर्गसंपदेने नटलेल्या जिल्ह्यात कृषी पर्यटनात वाढ होण्यासाठी हे धोरण उपयुक्त ठरणार आहे.

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास करणे,शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करणे व कृषी पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे, लोककला आणि परंपरांचे दर्शन घडविणे, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव हेही ग्रामीण पर्यटन विकासातून शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, ग्रामीण भागात पर्यटन विकासाने रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करण्यासाठी होम स्टे आदी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. पर्यटनाप्रती नागरिकांमध्ये रुची वाढत आहे. त्या अनुषंगाने पर्यटनाचे क्षेत्र आर्थिक विकासालाही चालना देणारे ठरेल. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी कृषी विकास, ग्रामीण विकास व पर्यटन विकास यांचा एकसंध विचार करुन त्यानुरूप उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

मोहित आहूजा, नंदिनी मुळे, खुश जैन, अमृता गुल्हाने, मोहित देशपांडे, दिपक शिंदे, महेंद्र कांबळे, सारंग राऊत, नंदकिशोर शिरभाते, सचिन कुळकर्णी, चेतन हरणे, गोपाल लोहिया आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button