प्रशासकीयब्रेकिंग न्युज

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

आठवडा विशेष टीम― सोलापूर, दि. 28 : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि कोरोना नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम महाराष्ट्र शासनाने हाती घेतली आहे. याअंतर्गत जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

जनतेला कोविडमुक्त महाराष्ट्र मोहिमेत आपले योगदान नोंदविण्याची संधी मिळणार असून त्यांच्या अंगी असलेल्या कल्पकतेला, सृजनशीलतेला योग्य व्यासपीठ स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

निबंध, पोस्टर्स, आरोग्य शिक्षणाचे संदेश / घोषवाक्य आणि शॉर्ट फिल्म (लघुपट) अशा प्रकारच्या स्पर्धांचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थी गट, पालक-नागरिक गट अशा दोन गटात आणि ग्रामीण व शहरी अशा दोन्ही पातळ्यांवर स्पर्धा होणार आहेत.

स्पर्धेचा कालावधी 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2020 असा आहे. सर्व स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील स्पर्धक त्यांच्या विधानसभा मतदारसंघस्तरावर सहभागी होऊ शकतील. तहसीलदार यांच्या नियंत्रणाखालील समिती या स्पर्धांचे संपूर्ण आयोजन करणार आहे. विधानसभा मतदारसंघस्तरावर पहिल्या तीन क्रमांकांची निवड करून त्यातून जिल्हास्तरावरील उत्कृष्ट तीन स्पर्धकांची निवड केली जाईल. विधानसभा मतदारसंघस्तरावरील विजेत्यांना ढाल आणि गुणानुक्रमे 3000 रुपये, 2000 रुपये आणि 1000 रुपये रोख रक्कम तर जिल्हास्तरावरील विजेत्यांना ढाल व गुणानुक्रमे 5000 रुपये, 3000 रुपये व 2000 रुपये रोख रक्कम अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.

बक्षीसप्राप्त निबंध, पोस्टर्स, मेसेजेस व शॉर्ट फिल्म यांना राज्यस्तरावर प्रसिद्धी देण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

इच्छुक स्पर्धकांनी त्यांचे निबंध, पोस्टर्स, मेसेजेस व शॉर्ट फिल्म हे आपल्या मतदारसंघाशी संबंधित तालुकास्तरीय समितीने घोषित केलेल्या ईमेल आयडीवर पाठवावेत. त्यासाठी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

स्पर्धकांनी आपल्या मतदारसंघनिहाय करमाळा- karmalamkmj@gmail.com, माढा- madhamkmj@gmail.com, बार्शी- barshimkmj@gmail.com, मोहोळ- moholmkmj@gmail.com, सोलापूर शहर उत्तर- solapurcnmkmj@gmail.com, सोलापूर शहर मध्य- solapurccmkmj@gmail.com, अक्कलकोट- akkalkotmkmj@gmail.com, सोलापूर दक्षिण- solapursmkmj@gmail.com, पंढरपूर- pandharpurmkmj@gmail.com, सांगोला- sangolamkmj@gmail.com, माळशिरस- malshirasmkmj@gmail.com या ईमेल आयडीवर आपले साहित्य पाठवावे.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.