Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम― अमरावती, दि. 28 : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुरेशा खाटा व इतर सुविधा उपलब्ध असाव्यात, यासाठी विविध प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत आहेत. त्यानुसार येथील विभागीय क्रीडा संकुलात 200 खाटांचे रूग्णालय निर्माण करण्याचे नियोजन असून, संकुल परिसराची पाहणी विभागीय आयुक्त पीयुष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केली.
या अनुषंगाने विभागीय आयुक्त श्री.सिंह, जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात विभागीय क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये 200 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येईल. त्यासाठी आवश्यक सर्व सुविधा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विहित वेळेत उभारण्यात याव्यात, असे निर्देश श्री. सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता खाटांच्या उपलब्धतेसाठी विविध प्रयत्न होत आहेत. क्रीडा संकुलात कोविड सेंटर उभारण्याची सुरुवात करण्यात येईल. त्याचप्रमाणे, आयटीआय परिसरातील प्रशिक्षण केंद्राच्या जागेत 60 व सुपर स्पेशालिटी रूग्णालय परिसरातील इमारतीत 40 अशा एकूण 100 खाटांची अतिरिक्त रूग्णालय सुविधा निर्माण करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने व इतर यंत्रणांनी समन्वयाने ही कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.