जिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

अलिबाग,जि.रायगड दि.२८ :- आधी कोरोनाचे संकट, त्यानंतरचे निसर्ग चक्रीवादळाचे संकट यामुळे जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला बळ देण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र इन्श्युरन्स कंपन्या आणि पोल्ट्रीधारकांनी सामंजस्य वृध्दिंगत करुन एकमेकांमधील विश्वासार्हता टिकवावी. जिल्हा प्रशासन व राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नातून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास निश्चित साधला जाईल, असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील पोल्ट्रीधारकांच्या अडीअडचणीविषयी उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात इन्श्युरन्स कंपन्यांचे अधिकारी,पोल्ट्रीधारक शेतकरी असोसिएशनचे पदाधिकारी, पोल्ट्रीधारक शेतकरी यांची बैठक खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड , जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, विभागीय व्यवस्थापक शांता विश्वास, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद निंबेकर उपस्थित होते.

खासदार सुनिल तटकरे यांनी उपस्थित पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांकडून त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न समजून घेतले. श्री.तटकरे म्हणाले की, मागील काही महिन्यांपासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील छोटे-मोठे पोल्ट्रीधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींनी, कुक्कुटपक्षी विकत घेणाऱ्या कंपन्यांनी, विमा कंपन्यांनी पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ उद्दिष्टपूर्तीकरिता काम न करता लहान पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करुन बळ द्यायला हवे. या कामाकरिता जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण पातळीपर्यंत समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करावेत. छोट्या पोल्ट्रीधारकांनाही आवश्यक ते विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे, यासाठी आवश्यक ती कार्यवाही विमा कंपन्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून करावी. कुक्कुटपक्षी विकत घेणाऱ्या कपंन्यांचे प्रतिनिधी ,विमा कंपन्याचे प्रतिनिधी व पोल्ट्रीधारक शेतकरी यांच्यात परस्पर संमतीने जो काही व्यावसायिक करार होतो, त्या कराराची प्रत संबंधित शेतकरी तसेच कंपनी असे दोघांकडेही असणे आवश्यक आहे. जसे शेतीमालाला किमान आधारभूत किंमत दिली जाते त्याच धर्तीवर पोल्ट्रीव्यावसायिकांनाही त्यांच्या कुक्कुटपक्षांसाठी किमान आधारभूत किंमत दिली जावी, त्यादृष्टीने योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक व्यावसायिकांचे फेडरेशन तयार करुन त्याला सहकाराची जोड देऊन पोल्ट्रीव्यवसाय देखील नियोजित पध्दतीने चालावा यासाठी योग्य ते प्रयत्न केले जावेत, असे सांगून खासदार सुनिल तटकरे यांनी प्रधानमंत्री यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, पोल्ट्रीधारकांना मिळेल याची मोहीम जिल्हा प्रशासनाने राबवावी, असे अधिकाऱ्यांना सूचित केले.

बैठकीस विविध राष्ट्रीयकृत बँका, विमा कंपन्या, कुक्कुटपक्षी विकत घेणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची, पोल्ट्रीव्यवसाय करणारे शेतकरी यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.